मतदार मॅपिंगचा टक्का वाढता वाढता वाढे; नवापूर ९०% च्या पार, पण नंदुरबारचे घोडे ८०%च्या आतच अडलेले!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मतदार याद्या अधिक अचूक पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष माहिती पुनरावलोकन (एसआयआर) मोहिमेत नंदुरबार जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख ९ हजार ४७९ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे मतदारांच्या मॅपिंगचा मंगळवारी (दि. २१) दुपारी ८० टक्क्यांचा टप्पा ओलांडून ८१.९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या कामात दुर्गम भाग असलेल्या नवापूर तालुक्याने ९० टक्क्यांची पातळी ओलांडत आघाडी कायम ठेवली असून, शहरी भाग असलेला नंदुरबार तालुका मात्र अजूनही ७७.२९ टक्क्यांवरच अडलेला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सध्या २००२ च्या मतदार यादीचे २०२४ च्या यादीशी मॅपिंग सुरू आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या टप्प्यावर हे मॅपिंग केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १३ लाख ५६ हजार ८६८ पैकी ११ लाखांहून अधिक मतदारांचे मॅपिंग पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. अर्थात असे असले तरी जिल्ह्यात अजूनही दोन लाख ४४ हजार ६४८ मतदारांचे मॅपिंग अद्यापही बाकी असल्याचे आकडेवारी सांगते.
नवापूरकरांना सलाम
मतदार मॅपिंगच्या कामात नवापूर तालुक्याने जिल्ह्यात इतर तालुक्यांना खूपच मागे सोडले आहे. नवापूर तालुक्यात मंगळवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत मतदार मॅपिंगचे तब्बल ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या तालुक्यात २ लाख ९९ हजार ६४३ मतदार असून, त्यापैकी दोन लाख ६९ हजार ६६९ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. अक्कलकुवा तालुका ७४.७५ टक्क्यांसह दुसऱ्या तर शहादा तालुका ७४.७४ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
प्रशासनाकडून गंभीर दखल
दरम्यान, एआयआर मॅपिंगच्या कामात नंदुरबार तालुक्यातील बीएलओंकडून सुरू असलेल्या कूर्मगतीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. येत्या शनिवारपर्यंत नंदुरबार तालुक्यातील बीएलओंनी या कामाची गती न वाढल्यास जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
एसआयआर मॅपिंगचे काम नंदुरबार जिल्ह्यात वेगात सुरू आहे. आतापर्यंत नवापूर तालुक्यात ९० टक्के काम पूर्ण झाले असून, तेथील बीएलओचे काम कौतुकास्पद आहे. इतर विधानसभा मतदारसंघातही मतदार मॅपिंगच्या कामाला वेग देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
– कल्पना निळ – ठुबे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), नंदुरबार



