नंदुरबार जिल्हा

ब्रेक फेल, विद्यार्थ्यांनी भरलेला टेम्‍पो ट्रॅव्‍हलर थेट डिव्‍हायडरवर चढला; मध्‍ये स्‍कुटीला उडवले, एक गंभीर जखमी; टेम्‍पोतील ११ विद्यार्थी मात्र बचावले, तळोदा तालुक्‍यातील थरार

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सुटीनिमित्त नंदुरबार जिल्‍ह्यात फिरायला आलेल्‍या अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील विद्यार्थ्यांना अपघाताचा थरार अनुभवयाला मिळाला. या विद्यार्थ्यांनी भरलेला टेम्‍पो ब्रेक फेल झाल्‍याने थेट डिव्‍हायडरवर चढला. अचानक झालेल्‍या या प्रकारात बचावासाठी प्रयत्‍न करताना टेम्‍पोने समोरून येणार्‍या एका स्‍कुटीलाही जोरदार धडक दिली. यात स्‍कुटीस्‍वार तरुण गंभीर जखमी झाला. तर डिव्‍हायडरला धडक देऊन टेम्‍पो तेथेच थांबल्‍याने आत बसलेल्‍या ११ विद्यार्थ्यांचा जीव दैव बलवत्तर असल्‍याने बचावला.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजचे विद्यार्थी सुटीनिमित्त नंदुरबार जिल्‍ह्यात फिरण्‍यासाठी आले होते. बुधवारी (दि. १८) सकाळी हे ११ विद्यार्थी फोर्स कंपनीच्‍या टेम्‍पो ट्रॅव्‍हलर (क्र. एमएच १७ सीव्‍ही ०५४३) या वाहनातून ट्रॅव्हल्स तळोद्याकडे येत होते. याचवेळी पिसावार पुलावर या टेम्‍पो ट्रॅव्‍हलरचे ब्रेक फेल झाले. अचानक हा प्रकार घडल्‍याने टेम्‍पो ट्रॅव्‍हलरचा चालक वाल्मीक शंकर मुर्तडक याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. तरीही या गोंधळातही त्‍याने प्रसंगावधान राखून वाहन थांबविण्‍याच्‍या हेतूने ते डिव्‍हायडरवर चढवण्‍याचा प्रयत्‍न केला. याच दरम्‍यान या टेम्‍पो ट्रॅव्‍हलरने समोरून येणार्‍या स्कुटी (क्र. एमएच २० एफ १६७१) ला जोरदार धडक दिली. बसली. या धडकेत स्कुटीस्वार अजय श्रावण पावरा (२३, रा. चांदसैली) हा तरुण गंभीर जखमी झाला. तो या मार्गावरून प्रकाशाकडे जात होता.
अपघाताची तीव्रता इतकी होती की, डिव्‍हायडरला धडकल्‍यानंतर टेम्‍पो ट्रॅव्‍हलरचे पुढील चाक निखळले. तसेच स्कुटीचेही प्रचंड नुकसान झाले. घटनेनंतर या रस्‍त्‍यावरून जाणार्‍या इतर वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला मदत केली. दरम्‍यान, अजय पावरा याला तातडीने प्रकाशा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातग्रस्‍त वाहनातील सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून घरी नेण्‍यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button