गुन्हे वार्ता

महाराष्‍ट्र पोलिसांना नाही जमलं, पण गुजरात पोलिसांनी करून दाखवलं! : चोरीच्‍या दुचाकीचे पोस्‍टमार्टम करून सुटे भाग विकणारी टोळी गजाआड; शहादा- खापरमधील तिघांना अटक, दोन फरार

शहादा (खास बातमीदार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यात वाहन चोरीच्‍या घटना वाढल्‍या असतानाच या चोरट्यांना पकडण्‍यात स्‍थानिक पोलिसांना अपयश येत असतानाच हेच काम गुजरात पोलिसांनी मात्र करून दाखवले आहे. या प्रकरणात गुजरातच्‍या कुकरमुंडा पोलिसांनी तीन चोरट्यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या असून, हे तिघेही महाराष्‍ट्राच्‍या शहादा, खापर व अक्‍कलकुवा येथील आहेत. यातील दोघे अद्याप फरार असून, महत्त्‍वाचे म्‍हणजे ही टोळी दुचाकी चोरल्‍यावर त्‍याचे सुटे भाग करून त्‍याची विक्री करीत होती. त्‍यामुळे कोणताही पुरावा मागे राहत नसतानाही गुजरात पोलिसांनी या चोरट्यांच्‍या मानगुटीवर हात टाकण्‍यात यश मिळविले आहे, हे विशेष.
खास सूत्रांनी ‘नंदुरबार पोस्‍ट’ला दिलेल्‍या माहितीनुसार, २५ मे रोजी कुकरमुंडा (गुजरात) पोलीस ठाण्‍याचे कर्मचारी अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना महाराष्ट्रातील खापर येथून येणार्‍या एमएच ०४ डीएन ०४२७ या क्रमांकाच्‍या वाहनाबाबत संशय आला. हे पांढर्‍या रंगाचे वाहन या पथकाने आश्रावा (ता. कुकरमुंडा) गावाजवळील तीन रस्त्याजवळ थांबवून या वाहनाची तपासणी केली. यावेळी या वाहनातत दुचाकी वाहनांचे सुटे भाग (स्पेअर पार्टस्‌) आढळून आले.
चौकशीअंती पोलिसांनी या वाहनातील फरदीन मेहमूद पठाण (२३, रा. खेतिया रोड, पेट्रोल पंपासमोर, शहादा, जि. नंदुरबार) आणि रेहान झाकीर पिंजारी (१९, रा. खेतिया रोड, गोसियानगर गल्ली, शहादा, जि. नंदुरबार) या दोघांना दुचाकींच्‍या स्पेअर पार्ट्ससह ताब्‍यात घेतले. पिंजारीची सखोल चौकशी केल्‍यावर त्‍याच्‍या जबानीतून भायुभाईचे नाव समोर आले. सदरील दुचाकी भायुभाई (रा. खापर, ता. अक्कलकुवा) यांची असल्याचे सांगण्यात आले.
मोटरसायकलचे सुटे भाग घेऊन एका वाहनात भरून शहादा येथील सोनू लतीफ शेख यांना देण्‍यात येणार होते, अशी माहिती आरोपींच्‍या चौकशीतून पुढे आले. यानंतर तांत्रिक तपास करून मोटरसायकलच्या इंजिन नंबरच्या आधारे ई-गुजकॉप ॲप्लिकेशनद्वारे वाहन मालकाची माहिती मिळविली. यातून सदरचे वाहन विजयसिंगभाई साध्याभाई तडवी (रा. सरदार नगर, पोस्ट- राजविरी, तळोदा, जि. नंदुरबार) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्‍काळ वाहन मालक तडवी यांना बोलावून चौकशी केली असता, त्यांची मोटरसायकल आश्रावा (ता. कुकरमुंडा) गावातून चोरीला गेल्याची माहिती पुढे आली.
यामुळे आरोपी दुचाकीची चोरी केल्‍यानंतर त्‍याचे पोस्‍टमार्टेम करून सुटे भाग वेगळे करीत त्‍यांची विक्री करीत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. असे करून चोरटे चोरलेल्‍या दुचाकीबाबत कोणताही पुरावा मागे राहणार नाही, याची काळजी घेत होते, असेही स्‍पष्‍ट झाले.
यानंतर पोलिसांनी फरदीन व रेहान यांच्‍यावर अटकेची कारवाई करून त्‍यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयात या दोघांनी भट्टू उर्फ अरबाज शफी पिंजारी (२४, रा. आमली फलिया, खापर, ता. अक्कलकुवा), सोनू लतीफ शेख (शहादा) आणि सलमान (अक्कलकुवा) हेही या प्रकरणात आपले साथीदार असल्‍याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी भट्टूलाही अटक केली. मात्र, इतर दोन आरोपी सोनू व सलमान हे मात्र फरार आहेत. पोलिसांनी दुचाकीचे स्पेअर पार्टस व चारचाकी वाहनासह एक लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल केला आहे.
गुजरात पोलिसांचे कौतुक
गेल्‍या काही महिन्‍यांत गुजरात व मध्‍यप्रदेशच्‍या सीमेवर असलेल्‍या नंदुरबार जिल्‍ह्यात दुचाकींच्‍या चोरीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या चोरट्यांना पकडण्‍यात नंदुरबार व विशेषत: शहादा पोलिसांना फारसे यश येत नसताना गुजरात पोलिसांना यश आल्‍याने त्‍यांचे कौतुक होत आहे. दरम्‍यान, आता शहादासह तालुक्‍यातून चोरीला गेलेल्‍या दुचाकींचेही सुटे भाग करून त्‍यांची विक्री तर झालेली नाही ना, हे शोधण्‍याचे आव्‍हान शहादा पोलिसांसमोर येऊन ठेपले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button