गावकर्यांनी पदावर बसवलं आणि त्यांनीच पद काढून घेतलं!; शहाद्यातील कन्साईच्या लोकनियुक्त सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर, १४५३ पैकी ९०४ मते गेली विरोधात
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ‘देव देतो अन् वेळ आली की तो काढूनही घेतो’ असे नेहमीच बोलले जाते. राजकारण्यांसाठी तर मतदार हेच देव. या देवांनी भरभरून दान पदरात टाकले तर राजकारणात रंकाचा राव अन् रावाचा रंक होतो. याचाच प्रत्यय शहादा तालुक्यातील कन्साई गावच्या सरपंच सविता सांबरसिंग पावरा यांना शुक्रवारी (दि. २९) आला. पावरा यांना ग्रामसभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने पदावरून पायऊतार व्हावे लागले. तब्बल ६२ टक्क्यांहून अधिक गावकर्यांची मते विरोधात गेल्याने पावरा यांना सरपंचपद गमवावे लागले.
१३ मे रोजी तहसीलदारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत १५ सदस्यांनी सविता पावरा यांच्यावर अविश्वास दाखवत तसा ठराव मंजूर केला होता. मनमानी पद्धतीने गावचा कारभार हाकणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे, विकास कामात दुजाभाव आणि मनमानी करणे, असे विविध आरोप पावरा यांच्यावर सहकारी सदस्यांनी केले होते.
हा अविश्वास ठराव पारीत झाल्याने शुक्रवारी (दि. २९) गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. शहाद्याचे प्रांताधिकारी नामदेव पाटील या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. या विशेष ग्रामसभेत सरपंच पावरा यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान पार पडले. गावातील एक हजार ४५३ ग्रामस्थांनी हजेरी लावलेल्या या विशेष ग्रामसभेत यापैकी तब्बल ९०४ मतांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने तर ५४९ जणांनी विरोधात मतदान केले. अविश्वास ठराव मंजुरीसाठी साध्या बहुमताची आवश्यकता असते. येथे मात्र सविता पावरा यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावाला तब्बल ९०४ गावकर्यांनी मंजुरी दिल्याने हा प्रस्ताव पारीत झाल्याची घोषणा प्रांताधिकारी नामदेव पाटील यांनी केली. तसेच सविता पावरा यांना तत्काळ पदमुक्त करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी जाहीर केले.
मोठा बंदोबस्त, यांची होती उपस्थिती…
कन्साईमध्ये विशेष ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी गावात मोठा फौजफाटा तैनात केला होता. या ग्रामसभेला तहसीलदार संभाजी पाटील, गटविकास अधिकारी महेश पोतदार, सहायक प्रशासन अधिकारी आर.एस. कुलकर्णी, विस्तार अधिकारी मनोज देव, अरुण वरसाळे, संजय बागले, वरिष्ठ सहायक बागले, गटशिक्षणाधिकारी डी.डी. राजपूत, मंडळ अधिकारी समाधान पाटील, निशिगंधा साळवे, ग्राम महसूल अधिकारी स्मिता पाटील, सुरेखा राठोड, कल्पना गिरासे, परिसरातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, तसेच महसूल व पंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



