शहाद्याचे नगरसेवक पुन्हा भांडले, पत्रिकेवरील ३० पैकी १४ विषय नामंजूर करूनच थांबले; पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार) : शहादा नगर पालिकेची सभा आणि सत्ताधारी व विरोधक यांची कोणत्या न कोणत्या कारणावरून होणारी खडाजंगी हे नेहमीचे चित्र शुक्रवारी (दि. २९) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा दिसून आले. नगरपालिका सभागृहात नगराध्यक्ष अभिजीत पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील तसेच मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा रंगली. या सभेत ठेवण्यात आलेल्या ३० पैकी १२ विषयांना मंजुरी देण्यात आली, ४ विषय स्थगित ठेवण्यात आले तर तब्बल १४ विषय नामंजूर करण्यात आले.
सभेदरम्यान शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा मुद्दा नगरसेवकांनी जोरदारपणे उपस्थित केला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक मुनेस जगदेव यांनी शहरातील नगरपालिका शाळांची दयनीय अवस्था सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्राप्त झालेल्या तब्बल १ कोटी ८९ लाख रुपयांच्या निधीबाबतचा ठराव सभेत मांडण्यात आला. मात्र, या विषयावर अधिक चर्चा आवश्यक असल्याचे सांगत संबंधित विषयाला स्थगिती देण्यात आली.
ॲड. पठाण, तेली – वाल्हे भिडले
सभेदरम्यान काही काळ वातावरण तापलेले दिसून आले. बांधकाम सभापती संतोष वाल्हे आणि नगरसेवक वसीम तेली तसेच ॲड. दानिश पठाण यांच्यात शाब्दिक वाद झाला. दोन्ही बाजूंमध्ये तू-तू, मैं-मैं होत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पालिकेच्या सभेत शहरातील मूलभूत प्रश्न, शाळांची अवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने ही सभा चांगलीच चर्चेचा विषय ठरली.
निलंबनाची सूचना, पण वाल्हे बचावले…
नगराध्यक्ष अभिजित पाटील हे बांधकाम विभागाचे विषय विषय पत्रिकेवर घेत नसल्याचा आरोप बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी केला. त्याला अनुमोदन देत उपनगराध्यक्षा माधवी पाटील आणि भाजपच्या नगरसेवकांनी वाल्हे यांना पाठिंबा दिला. यावरून सभेत बराच काळ गोंधळ सुरू राहिला. यातच नगराध्यक्षांनी नगरपालिका अधिनियम ८१ (७) अन्वये सभापती वाल्हे यांना ३ सभांसाठी निलंबित करण्याची सूचना मांडली. मात्र, सभा संपेपर्यंत या विषयावर चर्चाच होऊ शकली नसल्याने यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.



