खरात प्रकरणाने उठवला राज्यातील भोंदूंचा बाजार : ५० बाबाविरोधात गुन्हे; महिलांच्या शोषणाचे प्रमाण अधिक, सर्वाधिक ५ गुन्हे नाशिक जिल्ह्यात

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूंचे पेव फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर सव्वा दोन महिन्यात पोलिसांनी राज्यात ५० भोंदू बाबांच्या दरबाराचा बाजार उठवला आहे. यात सर्वाधिक ५ गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह ॲड. रंजना गवांदे व सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी दिली. राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी ही गुन्ह्यांची यादी संकलित केली आहे.
नाशिक येथील भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर दोन महिन्यात राज्यात एकूण ५० गुन्हे दाखल झाले आहे. यातील बहुतांश प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणार्या या प्रकरणांत काही ठिकाणी उत्स्फूर्त गुन्हे दाखल झाले. तर काही ठिकाणी त्यासाठी ‘अंनिस’ला प्रयत्न करावे लागले. बहुतांश सर्वच धर्मात भोंदू बाबांचे पेव फुटल्याचे गुन्हे दाखल झालेल्यांच्या यादीवरून स्पष्ट होते.
भोंदू बाबांनी ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही महिला व पुरुषांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे. विशेषत: यात महिलांच्या शाररिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भीती व सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक प्रकरणांत पीडित समोर येण्यास घाबरत असले तरी खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे. त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याचा फायदा
अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १८ वर्ष लढा दिला. या संघर्षानंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम २०१३’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते. या कायद्याची प्रभावी अंबलबजवणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी ‘अंनिस’ मर्यादा व क्षमता याचा विचार करता, आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत.
जादूटोणा विरोधी किंवा इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल ५० गुन्ह्यांचा तपशील पुढीलप्रमाणे
अशोक कुमार खरात (नाशिक), गडगेबाबा उर्फ राजेंद्र गडगे (संगमनेर, अहिल्यानगर), चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर, अकोला), पंकज देवराम घोलप (येडगांव, पुणे), मोहन मामा भोसले (कुर्डुवाडी, सोलापूर), नाना बर्डे (आळे फाटा, पुणे), ऋषिकेश वैद्य (वसई, मुंबई), अल्ताफ रईस खान (मालाड, मुंबई), रिधम पांचाळ (मालाड, मुंबई), गणेश शिंदे (श्रीरामपूर, अहिल्यानगर), अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा (नवी मुंबई), विठोबा वाल्मिक जाट (सातपूर, नाशिक), किसन तळपे (मंदोशी, खेड), महेशगिरी उर्फ महेश काकडे (लासलगाव, नाशिक), अब्दुल रशीद शेख (खालापूर, रायगड), इरफान नियाज अहमद (कांदिवली, मुंबई), अनिल सोलोमन सिंग – पादरी (पुणे), शिवराम पराश सावर (पालघर), अल्ताफ हसन मदारी (जळगाव), नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर (टेंभुर्णी, सोलापूर), पिंटू धुमाळ (बारामती, पुणे), हेमदास किसन बावणे (अड्याळ, भंडारा), चंद्रकांत राजेंद्र माळी (इगतपुरी, नाशिक), अशोक मधुकर आढाव (श्रीरामपूर, अहिल्यानगर), औदुंबर गडदे (स्वारगेट, पुणे), नवनाथ गवळी (खेड, पुणे), शाहिद शेख (खडकपाडा, कल्याण), शिव भाऊ सोनवणे (सर्जेपुरा, अहिल्यानगर), ज्ञानेश्वर नागोराव कोरडे (बिलोली, नांदेड), रमेश गुप्ता (मालाड, मुंबई), हरिगिरी दत्तगिरी महाराज (भाग्यनगर, नांदेड), मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित (ठाणे), कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते (पश्चिम देवपूर, धुळे), यशवंत एकनाथ थोरात (पारनेर, अहिल्यानगर), श्याम महाराज राठोड (दिघी, पुणे), सुधाकर गाडगे (बाळापूर, अकोला), परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड (उत्तमनगर, पुणे), शितल सालके व पोर्णिमा सारस्वत (भारती विद्यापीठ, पुणे), योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार (निजामपूर, साक्री, धुळे), विठ्ठल पवार (महागाव, यवतमाळ), ताहीर रशीद बेग (सक्करदरा, नागपूर), सुधाकर रमेश काळे (अंजनगाव सुर्जी, अमरावती), अशोक रामधन राठोड (वडगाव – जंगल, यवतमाळ), महेश मोहन बाबर (विटा, सांगली), कमलेश महाराज अधिकारी (इंदिरानगर, नाशिक), परवेज अब्दुल अजीज मेमन (कोंढवा, पुणे), गंगाधर बुरांडे (सावली, चंद्रपूर), भीमराव पुंजाराम बिहाडे (संभाजीनगर), मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज (कन्नड, संभाजीनगर), राजू बन्सी दिवटे (पारनेर, अहिल्यानगर).



