राजकारण

मोरखीतील अविश्‍वास प्रकरण भलत्‍याच दिशेला ; विरोधातील एकाला सरपंचांनी तुडवले, एकूण ६ जणांवर गुन्‍हा; अक्‍कलकुवा पोलिसांत गुन्‍हा दाखल

अक्‍कलकुवा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अक्‍कलकुवा तालुक्‍यातील मोरखी येथील सरपंच मिलनकुमार बंडू वळवी यांच्‍याविरोधात दाखल अविश्‍वास प्रस्‍ताव अखेर ६ विरूद्ध २ अशा मतफरकाने फेटाळला गेला. मात्र, या अविश्‍वास प्रस्‍ताव प्रकरणाला नंतर गालबोट लागले. विरोधात अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल केल्‍याच्‍या रागातून सरपंच आणि त्‍यांच्‍या वडिलांनी अन्‍य चौघांच्‍या मदतीने एकाला जबर मारहाण केल्‍याची तक्रार अक्‍कलकुवा पोलिसांत दाखल झाली आहे.
मोरखी ग्रामपंचायतीत सरपंच मिलनकुमार वळवी यांच्‍या विरोधात काही सदस्‍यांनी अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल केला होता. २७ मे रोजी या संदर्भात तहसीलदार विनायक घुमरे यांच्‍या उपस्‍थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी झालेल्‍या प्रत्‍यक्ष मतदान प्रक्रियेत सरपंचांसह ६ मते सरपंचांच्‍या बाजूने तर दोन मते विरोधात पडली. अन्‍य दोन सदस्‍य गैरहजर राहिले. यामुळे अविश्‍वास प्रस्‍ताव फेटाळला गेला.
सरपंचांचा आरोप
प्रस्‍ताव फेटाळला जाताच सरपंच मिलनकुमार वळवी यांनी आक्रमक होत विरोधी सदस्‍यांवर गंभीर आरोप केले. काही सदस्‍यांकडून वारंवार बदनामीचा प्रयत्‍न होत असून, काही सदस्‍यांकडून कामकाजात अडथळा आणणे, पैशांची मागणी करणे, धमक्‍या देणे असे प्रकार होत असल्‍याचे वळवी यांनी सांगितले.
टोळक्‍यासह मारहाण केल्‍याचा सरपंचांवर गुन्‍हा
अविश्‍वास प्रस्‍ताव प्रक्रियेच्‍या वेळी तणावपूर्ण वातावरणाच्‍या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत परिसरत तसेच गावात पोलिसांनी तगडा बंदोबस्‍त तैनात केला होता. असे असतानाही सरपंच व त्‍यांच्‍या वडिलांसह एकूण ६ जणांनी आपल्‍याला मारहाण केल्‍याची फिर्याद एका ग्रामपंचायत सदस्‍याच्‍या पतीने अक्‍कलकुवा पोलिसांत दाखल केली आहे. अमरसिंग सोमा पाडवी (४८, रा. मोरखीचा टोकणपिंप्री पाडा) असे फिर्यादीचे नाव आहे. आपल्‍याविरोधात अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल केल्‍याच्‍या रागातून सरपंच मिलनकुमार वळवी, त्‍यांचे वडिल बंडू पुन्‍या वळवी (दोघेही रा. मोरखीचा टोकणपिंप्री पाडा) या दोघांनी आपणास सकाळी १०.३० वाजेच्‍या सुमारास शिविगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्‍याची धमकी दिली. तर त्‍यांचे साथीदार आंब्‍या सिंगा वसावे, खातुड्या गुजर्‍या वसावे, रामा जिया वसावे, सन्‍या दिल्‍या वसावे (चौघेही रा. मोलगीचा मालीआंबा पाडा, ता. अक्‍कलकुवा) हे चौघे वळवी पिता-पुत्राला आपल्‍याला मारहाण करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत होते. या मारहाणीत आपल्‍याकडील मोबाईल फुटून त्‍याचेही नुकसान झाले. अशा स्‍वरूपाची फिर्याद अमरसिंग पाडवी यांनी या एकूण सहा जणांविरोधात दाखल केली आहे. यावरून अक्‍कलकुवा पोलीस ठाण्‍यात भारतीय न्‍याय संहितेच्‍या विविध कलमान्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून, पोलीस हवालदार जगदीश मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button