दोन साध्वींचा अपघात नव्हे घातपात; संतापलेल्या सकल जैन समाजाचा आरोप; नंदुरबारमध्ये निवेदन देऊन केली कठोर कारवाईची मागणी

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : मध्यप्रदेशातील रिवा येथे दोन साध्वींच्या झालेल्या अपघाती मृत्यूमुळे जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. नंदुरबारमध्येही सकल जैन समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांना निवेदन सादर करीत या अपघातास जबाबदार असलेल्या वाहन चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.
परमपूज्य १०५ श्रुतमती माताजी आणि परमपूज्य १०५ उपशममती माताजी या पायी विहार करीत असताना एका वाहनचालकाने त्यांच्या अंगावर वाहन चालविल्याने झालेल्या दुर्दैवी घटनेत दोन्ही पूज्य साध्वींचे निधन झाले. हा केवळ अपघात नसून, घातपात असल्याचा संशय जैन समाजाने व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संतापलेल्या जैन समाजाकडून सर्वत्र निषेध व्यक्त केला जात असून, नंदुरबारमध्येही सकल जैन समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची भेट घेत निवेदन देऊन या घटनेच्या चौकशीची तसेच घटनेला कारणीभूत असलेल्या संबंधितांवर कारवाईची मागणी केली. यावेळी सानप यांना या घटनेची सविस्तर माहितीही देण्यात आली. तर जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी हे निवेदन स्वीकारले.
यावेळी सकल जैन समाजातर्फे सतीश दोषी, सतीश अजमेरा, प्रकाश कोचर, सुरेश जैन, आकाश बेदमुथा, पीनल शाह, महेंद्र झांझरी, नेमीचंद पाटोदी, अनिल लोढा, पदम पाटोदी, डॉ. गंगवाल, नगरसेवक उमेश जैन, कैलाश जैन, जॉली शाह, नरेश कांकरिया, रवी श्रीश्रीमाळ, देवेंद्र जैन, हर्षल बेदमुथा, आगम शाह, आशिष जैन, मोहनलाल जैन, संजय अंबानी, भूषण कटारिया, एस.डी. जैन, राजेंद्र चोपडा, जितेंद्र पहाडिया, विजय अजमेरा यांच्यासह चतुर्विध संघाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.



