शॉर्टसर्किटने केला घात, चार एकरांवरील गहू क्षणार्धात झाला खाक; नंदुरबारच्या सैंदाणे शिवारातील दोन शेतकर्यांवर रडण्याची वेळ
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शेतातून गेलेल्या वीज तारांचे घर्षण (शॉर्टसर्किट) चार एकर क्षेत्रावरील शेतातील काढणीला आलेला गहू जळून खाक झाल्याची दुर्घटना नंदुरबार तालुक्यातील सैंदाणे शिवारात घडली. यामध्ये दोन शेतकर्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला असून, त्यांच्यावर रडण्याची पाळी आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिगंबर गोपीचंद पाटील यांची सैताणे शिवारात दोन ते अडीच एकर तर त्यांच्या शेजारीच साहेबराव गंभीर पाटील यांची दीड एकर शेती आहे. या दोन्ही शेतकर्यांनी यंदाच्या हंगामात शेतात गव्हाची पेरणी केली होती. सध्या हा गहू काढणीला आला होता. दोघांनीही येत्या दोन दिवसांत गहू कापणी करण्याच्या अनुषंगाने नियोजनही करून ठेवले होते. या दोन्ही शेतांतून विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारांचे घर्षण होऊन त्याची ठिणगी दोन्ही शेतात पडली आणि गव्हाने पेट घेतला. काही क्षणांतच सगळा उभा गहू जळून खाक झाला. याशिवाय शेतात ठेवलेले ठिबकचे साहित्यही आगीच्या विळख्यात सापडून नष्ट झाले.
हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत आगीत होरपळून खाक होताना पाहून दोन्ही शेतकर्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. आता तलाठी घटनेचा पंचनामा करणार असल्याचे सांगण्यात आले.



