नंदुरबार जिल्हा

वाहन धुवाल तर वाढेल टेन्‍शन, ग्रामपंचायत कट करेल नळ कनेक्‍शन; वाढत्‍या पाणीटंचाईमुळे प्रकाशा ग्रामपंचायतीचा धडाकेबाज निर्णय

प्रकाशा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उन्‍हाळा सुरू होताच नंदुरबार जिल्‍ह्यात संभाव्‍य पाणीटंचाई टाळण्‍यासाठी ‘पाणी बचाव’ मोहिम सुरू झाली असून, उपलब्‍ध पाण्‍याचा योग्‍य वापर व्‍हावा, यादृष्‍टीने यंत्रणांनी पावले टाकायला सुरूवात केली आहे. याच अंतर्गत प्रकाशा ग्रामपंचायतीने महत्त्‍वाचे पाऊल उलचले आहे. पाण्‍याचा अपव्‍यय टाळण्‍यासाठी प्रकाशा गामपंचायतीने गावात वाहने धुण्‍यावर बंदी आणली असून, या नियमाचे उल्‍लंघन करणार्‍याचा नळपुरवठा खंडित करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. सोबतच ग्रा.पं.ने उन्‍हाळ्‍याच्‍या पार्श्वभूमीवर नवीन नळजोडणी देणेही थांबवले आहे.
उन्‍हाळा सुरू होताच गावागावांत वीजपुरवठा खंडित होण्‍याचे प्रकार वाढतात. शिवाय वीजेचा दाब कमी–जास्‍त झाल्‍याने वीजपुरवठा करणार्‍या यंत्रणा कोलमडून पडतात. गावातील पाणीपुरवठा करणार्‍या विद्युत मोटारींमध्‍ये तांत्रिक बिघाड होण्‍याच्‍या घटनांतही वाढ होत आहे. त्‍यामुळे गावातील पाणीपुरवठा सुरळित ठेवण्‍याचे आव्‍हान ग्रामपंचायतीपुढे उभे आहे.
या पार्श्वभूमीवर प्रकाशा ग्रामपंचायतीने गावात नोटीस लावून गावकर्‍यांना पाण्‍याचा अपव्‍यय टाळण्‍याचे आवाहन केले आहे. गावात नळाच्‍या पाण्‍याने दुचाकी, चारचाकी वाहने धुणे टाळावे, अंगणात सडा टाकू नये, अशी सूचनाच ग्रामपंचायतीने गावकर्‍यांना केली आहे. एवढेच नाही तर या सूचनांचे उल्‍लंघन केल्‍यास संबंधितांची नळजोडणी खंडित केली जाईल आणि आवश्‍यकता भासल्‍यास दंडात्‍मक कारवाईही केली जाईल, अशी तंबीही ग्रामपंचायतीने भरली आहे.

उन्‍हाळ्‍यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन गावात पाणीपुरवठा करणार्‍या विद्युत मोटारीत सातत्‍याने बिघाड होत आहे. शिवाय गावात काही जणांकडून पाण्‍याचा अपव्‍यय सुरू असल्‍याचे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे गावात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्‍यात येत असून, नवीन नळजोडणीलाही तूर्तास स्‍थगिती देण्‍यात आली आहे.
– बी.जी. पाटील (ग्रामसेवक, प्रकाशा)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button