राजकारण

शहादात राजकारण पेटले : अतिक्रमणाच्‍या मुद्यावर भाजपकडून अभिजित पाटलांना घेरण्‍याचा प्रयत्‍न, नगराध्‍यक्षांचाही पलटवार

शहादा (भालचंद्र पिंपळवाडकर / Aनंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अतिक्रमणाने वेढलेल्‍या शहादा शहरात जनता विकास आघाडीविरोधात भारतीय जनता पक्ष यांच्‍यातील राजकारण पेटले आहे. भारतीय जनता पक्षाने या मुद्द्याला हवा देत नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांना घेरण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला आहे. येत्‍या २० मार्चपर्यंत शहरातील अतिक्रमणांचा निपटारा न झाल्‍यास आमरण उपोषण करण्‍याचा इशाराच भाजपचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा. मकरंद पाटील यांनी दिला आहे. तर भाजपने निवडक अतिक्रमणे हटविण्‍याची मागणी करण्‍याऐवजी संयम बाळगावा. सहकार्य करावे. पोलिस बंदोबस्‍त उपलब्‍ध होताच शहरातील सगळी अतिक्रमणे हटविण्‍याची आपली तयारी आहे, अशा शब्‍दांत नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
शहादा शहरात दिवसागणिक अतिक्रमणे वाढत चालली असून, नगर पालिका याकडे दुर्लक्ष करून ही अतिक्रमणे काढण्‍यासाठी वेळकाढूपणा करीत असल्‍याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने या मुद्यावर थेट नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांना लक्ष्‍य केले आहे. भाजपचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा. मकरंद पाटील यांनी तर या मुद्यावर नगर परिषद मुख्‍याधिकार्‍यांना निवेदन देत त्‍यात शहरातील तीन प्रमुख अतिक्रमणांच्‍या विषयावर त्‍यांचे लक्ष वेधले आहे. मेमन जीन कंपाऊंड परिसर, दोंडाईचा रस्‍यालगत केशरानंद मंगल कार्यालयाजवळील रस्‍त्‍यावरील अतिक्रमण व शहरातील रस्‍त्‍यांवर लॉरीधारकांनी केलेले अतिक्रमण हटवावे आणि या अतिक्रमणांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीपासून शहरवासीयांची सुटका करावी, अशी प्रा. पाटील यांची प्रमुख मागणी आहे. प्रा. पाटील यांनी यासाठी नगर पालिकेला २० मार्चपर्यंतची मुदत दिली असून, या वेळेत निर्णय न झाल्‍यास २१ मार्चपासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्‍याचा इशाराही दिला आहे.
हे तर निव्‍वळ राजकारण : अभिजित पाटील
भाजपने अतिक्रमणाच्‍या मुद्यावर दिलेल्‍या निवेदनावर नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी पलटवार केला आहे. शहरात अतिक्रमणांचे प्रमाण वाढलेले आहे, हे खरे आहे. पण भाजप केवळ काही निवडक अतिक्रमणे हटविण्‍याची मागणी करीत आहे. एक-एक अतिक्रमण हटविण्‍यासाठी पोलिसांकडून बंदोबस्‍त पुरविला जात नाही. शहरातील सर्वच अतिक्रमणे हटविण्‍याची प्रक्रिया आम्‍ही सुरू केली असून, त्‍यासाठी प्रशासनाकडे सहकार्य आणि पोलिसांकडे बंदोबस्‍ताची मागणीही केली आहे. पोलिसांकडून बंदोबस्‍त मिळताच या प्रक्रियेला गती देऊन शहर अतिक्रमणमुक्‍त करण्‍यात येईल, अशा शब्‍दांत नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी भाजपच्‍या भूमिकेवर प्रहार केला आहे. भाजपनेही त्‍यासाठी सहकार्य करावे आणि तूर्तास संयम बाळगावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
सर्वाधिक नगरसेवक भाजपचे, नगराध्‍यक्ष आघाडीचा
शहादा नगर परिषदेची निवडणूक दोन महिन्‍यांपूर्वी पार पडली. त्‍यात भाजपचे सर्वाधिक २० नगरसेवक निवडून आले. मात्र, नगराध्‍यक्ष म्‍हणून जनतेने जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील यांना निवडून दिले. विशेष म्‍हणजे अभिजित पाटील हे प्रा. मकरंद पाटील यांना पराभूत करूनच नगराध्‍यक्ष झाले आहेत. तेव्‍हापासून भाजप आणि अभिजित पाटील यांच्‍यात शह–काटशहचे राजकारण सुरू आहे. आता भाजपने उचललेला शहरातील अतिक्रमणाचा मुद्दाही याच राजकारणाचा भाग असल्‍याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. आता यावर काय मार्ग निघतो, याकडे शहादावासीयांचे लक्ष लागले असून, या राजकारणात शहरातील अतिक्रमणांचा मुद्दा मागे पडू नये, अशी अपेक्षाही व्‍यक्‍त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button