नंदुरबार जिल्हा

शहाद्याच्‍या केळीचा दर्जा वाढणार : आता मिळणार ‘जी-९’ केळीची रोपे, शहादा खरेदी-विक्री संघाचा नवा उपक्रम

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सर्वत्र प्रसिद्ध असलेल्‍या शहाद्यातील केळी उत्‍पादनाचा दर्जा आता आणखीच वाढणार आहे. कारण बियाणे, खते आणि कीटकनाशके विक्रीच्या वाढत्या स्पर्धेत आपले वेगळेपण सिद्ध करीत शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने आता केळी रोप विक्रीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. संघाच्‍या वतीने आनंद (गुजरात) येथील प्रसिद्ध आयकॉनिक इंटरनॅशनल कंपनीच्या ‘जी-९ व्हरायटी’ रोपांच्या विक्रीचा शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात करण्यात आला.
खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष काशिनाथ पाटील यांच्या हस्ते पहिल्या रोपांच्या गाडीचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी शरद पाटील यांच्याकडे रोपांचा क्रेट सुपूर्द करून विक्रीचा श्रीगणेशा झाला. याप्रसंगी प्रा. डी.सी. पाटील, संचालक रवींद्र विठ्ठल पाटील, सुदाम सोमजी पाटील, विनोद चिंतामण पाटील, अंबालाल पाटील, विश्वनाथ पाटील, आयकॉनिक कंपनीचे मार्केटिंग हेड मच्छिंद्र माळी, मॅनेजर अनिल पाटील आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसराचे नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन चेअरमन प्रा. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्‍यात आल्‍याचे खरेदी विक्री संघाकडून सांगण्‍यात आले.
दरम्‍यान, आतापर्यंत संघाकडे या रोपांच्‍या खरेदीसाठी २ लाख रोपांची नोंदणी झाली असून, मे अखेरपर्यंत ५ लाख रोप विक्रीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्‍यात आले आहे. विशेष म्‍हणजे शेतकर्‍यांनी खरेदी केलेली रोपे खरेदी विक्री संघ थेट त्‍यांच्‍या शेतापर्यंत पोहोचवून देणार आहे. १० एप्रिलपर्यंत १६ रुपये प्रति रोप आणि त्यानंतर १८ रुपये प्रति रोप या दराने केळी रोपांची बुकिंग सुरू राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरत आम्ही दर्जेदार केळी रोपांची हमी देत आहोत. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
– अनिल अशोक पाटील
(चेअरमन, खरेदी विक्री संघ, शहादा)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button