गॅसचा काळाबाजार : अक्कलकुव्यात अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या उल्लंघनाचा पहिला गुन्हा दाखल; अवैध गॅस रिफिलिंग सेंटर उद्ध्वस्त, एकाला बेड्या ठोकल्या
अक्कलकुवा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : घरगुती गॅस सिलिंडरच्या सुरू असलेल्या काळ्याबाजारावर ‘नंदुरबार पोस्ट’ने आवाज उचलताच नंदुरबार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अक्कलकुवा तालुक्यात घरगुती गॅसचे दुसर्या सिलिंडरमध्ये अवैध रिफिलिंग करताना एकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, राजमल मदन जैन (४८, रा. कोराई खापर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे त्याचे नाव आहे. अक्कलकुवा पोलिस आणि जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संयुक्तरित्या ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील कोराई खापर येथे एक व्यक्ती घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस अवैधरित्या दुसर्या गॅस सिलिंडरमध्ये भरून देत असल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि.१४) संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास छापा मारून राजमल मदन जैन याला अवैध कृत्य करताना रंगेहाथ पकडले.
असा सुरू होता कारभार
राजमल जैन याने घराच्या आडोशालाच अवैध गॅस रिफिलिंग सेंटर सुरू केले होते. तेथे तो ०.५ क्षमतेच्या मोटारला स्प्रे पंप व दोन नळ्या जोडून व दुसर्या बाजूला रबरी नळीने गॅस सिलिंडर जोडून त्याच्या साह्याने नोझलच्या मदतीने एका सिलिंडरमधील गॅस दुसर्या सिलिंडरमध्ये भरून देत असे. पोलिसांनी छापा मारल्यावर त्या ठिकाणी राजमल हे अवैध कृत्य करताना रंगेहात पडकला गेला. यावेळी त्याच्याकडून इंडेन कंपनीचे एकूण सहा घरगुती गॅसचे सिलिंडर, काळ्या रंगाचा वजन काटा, एक मोटार, एक स्प्रे, दोन रबरी नळ्या, नोझल असे एकूण ५१ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.
गॅस ज्वलनशील पदार्थ असूनही त्याचे अवैध रिफिलिंग करून काळाबाजार करून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालताना आढळल्याने राजमल जैन याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या २८७, २८८, १२५ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ नुसार अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांच्या वतीने पोलिस नाईक चेतन सावळे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गुमान सिंग हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. हेड कॉन्स्टेबल जगदीश पवार, महेंद्र नगराळे, पोलिस कॉन्स्टेबल रितेश बेलेकर, चेतन साळवे, दादाभाई मसूळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
‘नंदुरबार पोस्ट’ने उठवला होता आवाज
युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण परिस्थितीत नंदुरबार शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या वावड्या उठविण्यात येत होत्या. याचा गैरफायदा घेत काही लोकांकडून जिल्हाभर गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची बातमी देऊन ‘नंदुरबार पोस्ट’ने या विरोधात आवाज उठवला होता. त्याच्या दुसर्याच दिवशी अक्कलकुवा पोलिसांनी अवैध गॅस रिफिलिंग सेंटर उद्ध्वस्त केले हे विशेष.



