गुन्हे वार्ता

जातिवाचक शिविगाळीसह मजुराच्‍या हत्‍येचा प्रयत्‍न; नंदुरबार शहरातील धक्‍कादायक घटना; एकावर ‘ॲट्रॉसिटी’

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ‘हा ×××× इथे कसा आला’ अशी विचारणा करीत विशिष्‍ट जातीचा उल्‍लेख करतानाच जीवघेणा हल्‍ला करून मजुरी करणार्‍या तरुणाच्‍या खुनाचा प्रयत्‍न करण्‍यात आल्‍याची धक्‍कादायक घटना नंदुरबार शहरात शुक्रवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी एका २७ वर्षीय युवकावर अनुसूचित जाती व जमाती अत्‍याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या संदर्भात एका २१ वर्षीय तरुणाने शनिवारी संध्‍याकाळी उशीरा फिर्याद दाखल केली. नंदुरबार शहरातील धुळे नाक्‍याजवळील जैन पेट्रोलपंपाच्‍या बाजूला असलेल्‍या मोकळ्‍या सार्वजनिक जागेवर ही घटना घडली. हा २१ वर्षीय तरुण रात्री उशीरा आपल्‍या भावाला शोधण्‍यासाठी संबंधित घटनास्‍थळी गेल्‍यानंतर तेथे उपस्‍थित असलेल्‍या आकाश बाबुलाल धनगर (२७, रा. संजयनगर, नंदुरबार) याने त्‍याला उद्देशून ‘हा ×××× इथे कसा आला’ अशी विचारणा करीत त्‍याच्‍या जातीचा उल्‍लेख करून मोपेड गाडीतून धारदार लोखंडी शस्र काढून त्‍याच्‍या छातीवर खून करण्‍याच्‍या उद्देशाने जोरदार हल्‍ला केला.
दरम्‍यान, या प्रकरणी संबंधित पीडित तरुणाने शनिवारी (दि. १४) नंदुरबार शहर पोलिस ठाण्‍यात आकाश धनगर याच्‍याविरोधात भारतीय न्‍याय संहितेच्‍या कलम १०९ सह ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. आता हे प्रकरण चौकशीसाठी नंदुरबारचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्‍याकडे सोपविण्‍यात आले असून, पोलिस निरीक्षक निलेश देसले प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button