नंदुरबार शहरात टोळक्याची गुंडगिरी; वाहनधारकाला भररस्त्यात अडवून लुटले, शिविगाळ करीत मारहाणही केली; मध्यरात्री घडला थरार

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : टोळक्याने गुंडगिरी करीत एकाला अडवून त्याला शिविगाळ व मारहाण करीत लुटल्याची धक्कादायक घटना नंदुरबार शहरात उघडकीस आली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराजवळ घडलेल्या या घटनेप्रकरणी पाच जणांवर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौसिम अब्दुल धोबी (३२, व्यवसाय -चालक, रा. डोहका तकिया मशिदीजवळ, नंदुरबार) असे या प्रकरणी फिर्याद दाखल करणार्या तरुणाचे नाव आहे. मौसिम हा शुक्रवारी रात्रीच्या ११.४० वाजेच्या सुमारास आपले वाहन घेऊन जात असताना छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराजवळील भरकादेवी आईस्क्रीमनजीक टोळक्याने त्याची गाडी अडवली. यावेळी त्याला वाहनाबाहेर काढून पाच जणांनी मिळून आई–बहिणीवरून शिविगाळ करीत लाथाबुक्क्यांनी तसेच मोटारसायकलच्या चावीने छातीवर, डोक्यावर, खांद्यावर मारहाण केल. तसेच गाडीत ठेवलेले २० हजार रुपये लुटण्यात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी आकाश बाबुलाल धनगर (२७, रा. संजय नगर, नंदुरबार), विजय दिलीप पाटील (२२, रा. स्वराज्यनगर, अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ नंदुरबार), ऋषिकेश ऊर्फ राजा दिलीप मिस्री (२५, रा. विमल हाऊसिंग सोसायटी, नंदुरबार) तसेच अन्य दोघांविरोधात (नावे माहित नाहीत) भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक धर्मराज पटले या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



