नुसतीच घोषणा : एलसीबी पीआय हेमंत पाटील यांच्यावर कारवाईची हालचालच नाही; आ. रघुवंशी म्हणाले, होणार हे नक्की, पण कधी होईल याची वाट पाहतोय
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या बदलीसह त्यांनी दाखल केलेल्या काही गुन्ह्यांच्या प्रकरणांची पोलिस निरीक्षकांमार्फत चौकशीची घोषणा विधान परिषदेत झाली असली तरी १२ दिवसांनंतरही याबाबत सरकारकडून काहीही हालचाली झाल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आजी-माजी आमदारांना टार्गेट करून तक्रारींची कोणतीही शहानिशा न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. यामुळे त्यांची चौकशी करून त्यांची बदली करावी, अशी मागणी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात २० मार्च रोजी विधान परिषदेत लक्षवेधी मांडून विधान परिषदेत केली होती. यानंतर पाटील यांच्या बदलीसह त्यांनी दाखल केलेल्या काही गुन्ह्यांच्या प्रकरणांची पोलिस महानिरीक्षकांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात केली होती.
मात्र, या अनुषंगाने गेल्या १२ दिवसांत कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे. या संदर्भात आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, अधिवेशन काळात मंत्री महोदयांनी याबाबत घोषणा केली असल्याने संबंधितांवर ती कारवाई होणार, हे निश्चित आहे. फक्त ही कारवाई प्रत्यक्षात कधी होते, याची मी वाट पाहत आहे. परंतु, माझ्याकडून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
दुसरीकडे, याबाबत गृह विभागाकडून काही आदेश प्राप्त झाले आहेत का, याची विचारणा करण्यासाठी नंदुरबारचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
आ. रघुवंशी यांचे आरोप
अक्कलकुवाचे आमदार आमश्या पाडवी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी संबंधित व्यक्तींवर खोट्या आरोपावरून विनयभंगाचा तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक आ. पाडवी यांच्या बाबतीत अक्कलकुवा येथे ही घटना घडली त्यावेळी तेथे अक्कलकुवाचे पोलिस अधिकारी उपस्थित होते, असे तक्रारीत नमुद केलेले आहे. केवळ कुणी तक्रार करायला आले म्हणून गुन्हा नोंद केला, असे योग्य नाही. खरेतर फिर्याद नोंदवून घेण्याआधी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तक्रारीची शहानिशा करायला हवी होती. पण तसे न करता त्यांनी थेट फिर्याद नोंदवून घेत गुन्हा दाखल करून घेतला, अशी माहिती आ. रघुवंशी यांनी विधान परिषदेत दिली होती.
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. त्यामुळे या प्रकरणांची चौकशी करून संबंधित अधिकार्याची तत्काळ बदली करावी, अशी मागणी करीत आ. रघुवंशी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती सभागृहाला दिली होती.
बदलीसह चौकशी अन् गरज पडल्यास निलंबन : मंत्र्यांचे आश्वासन
माजी आमदारांशी संबंधित प्रकरणात दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल असून ॲट्रॉसिटी कायद्यान्वयेही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. एलसीबीच्या संबंधित पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित एलसीबी पोलीस निरीक्षकाला मुख्यालयात हलविले जाईल. आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आ. रघुवंशी यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना दिले होते.



