नंदुरबार जिल्हा

नंदुरबार तालुक्‍यात भीषण अपघात; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले, गादी बणवणार्‍या मजुरावर भल्‍या पहाटे काळाचा घाला

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेत दुचाकीस्‍वाराला प्राण गमवावे लागल्‍याची दुर्दैवी घटना नंदुरबार तालुक्‍यातील पातोंडा – कोळदा रस्‍त्‍यावर भल्‍या पहाटे घडली. लियाकत शब्‍बीर पिंजारी (४५, रा. खोंडामळी, ता. व जि. नंदुरबार) असे या अपघातात ठार झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव असून, या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कापूस पिंजण्‍याचे (गादी भरणे) काम करणारे लियाकत पिंजारी सोमवारी (दि. ३०) भल्‍या पहाटे कामानिमित्त जात होते. याच दरम्‍यान पहाटे ५.३० ते ६ वाजेच्‍या दरम्‍यान पातोंडा ते कोळदा रस्‍त्‍यावर कोळदा गावानजीकच्‍या अनुज पेट्रोल पंपापासून सुमारे २०० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाने त्‍यांच्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे ते रस्‍त्‍यावर फेकले जावून गंभीर जखमी झाले. जखमी अवस्‍थेतील लियाकत यांना स्‍थानिक रहिवाशांनी तातडीने रुग्‍णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्‍याने त्‍यांना नंदुरबारच्‍या सरकारी रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. मात्र, तत्‍पूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाला होता.
अपघातानंतर धडक देणार्‍या वाहनाचा चालक वाहनासह घटनास्‍थळावरून फरार झाला. अपघाताची माहिती मिळाल्‍यानंतर लियाकत यांचे भाऊ फिरोज शब्‍बीर पिंजारी यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्‍यात संबंधित अज्ञात वाहन चालकाच्‍या विरोधात फिर्याद नोंदवली. त्‍यानुसार गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून, तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक मोतीराम बागुल करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button