स्कुटीच्या डिकीत पावणेदोन लाख रुपये ठेवून जेवायला गेला अन् चोरट्याने डाव साधला; बँकेच्या एजंटवर डोके आपटायची वेळ, नंदुरबारमध्ये भरदुपारी घडला प्रकार
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ग्राहकांकडून जमा करून आणलेली आणि बँकेच्या खात्यातून काढलेली रोख रक्कम स्कुटीच्या डिकीत ठेवून जेवायला जाणे बँकेच्या कलेक्शन एजंटला महागात पडले आहे. या एजंटने स्कुटीच्या डिकीत ठेवलेली रक्कम आणि एक चेक अज्ञात चोरट्याने लंपास केला असून, नंदुरबार शहराच्या देसाईपुरा भागातील पंडित दिनदयाल पतपेढीसमोर सोमवारी भरदुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजंट नितीन सुनील सांगळे (४२, रा. प्लॉट नं. २५, बी ज्ञानदीप सोसायटी, नंदुरबार) हे पंडित दिनदयाल पतपेढीचे कलेक्शन एजंट म्हणून काम करतात. सोमवारी त्यांनी पतपेढीच्या ग्राहकांकडून गोळा केलेले १ लाख २१ हजार ५०० रुपये आणि बँकेच्या खात्यातून काढलेले ५० हजार रुपये अशी एकूण १ लाख ७१ हजार रुपयांची रोकड तसेच विशाल शिवाजी लकडे असे नाव लिहिलेला युनियन बँकेचा एक चेक असा सर्व ऐवज आपल्या पांढर्या रंगाच्या स्कुटीच्या (क्र. एमएच ३९ ए ९३५८) च्या सीटखालील डिकीमध्ये ठेवला होता. ही गाडी त्यांनी पतपेढीच्या देसाईपुरा भागातील शाखेसमोर रस्त्यावर उभी केली होती.
यानंतर सांगळे सहकार्यांसोबत जेवण करण्यासाठी पतपेढीच्या कार्यालयात गेले. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने या संधीचा गैरफायदा घेत त्यांच्या गाडीच्या डिकीचे लॉक तोडून रकमेवर डल्ला मारतत तेथून पोबारा केला. काही वेळाने जेवण करून तेथून परतून ते खातेदाराला पैसे देण्यासाठी पुन्हा गाडीकडे आले असता त्यांना गाडीच्या डिकीचे लॉक तुटलेले दिसले. शिवाय डिकीतील सर्व ऐवजही गायब होता. आसपास शोध घेऊनही काहीच हाती न लागल्याने अखेर त्यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार कथन केला.
सांगळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



