अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा सिलसिला सुरूच; शहादा तालुक्यातून आणखी दोन मुली फुस लावून पळवल्या

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढतच चालले असून, असेच आणखी दोन गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. यातील एक मुलगी १८ वर्षांची व्हायला अवघा दीड महिना बाकी असतानाच तिचे अपहरण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील मजुराने दाखल केलेल्या फिर्यादीत त्यांच्या १७ वर्षे १ महिना १८ दिवस वय असलेल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून लावल्याचे म्हटले आहे. ही घटना २७ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सलग तीन दिवस वाट पाहूनही मुलगी घरी न आल्याने अखेर तिच्या पित्याने शहादा पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास हेड कॉन्स्टेबल मोहन साळवे करीत आहेत.
दुसरी फिर्याद अन्य एका खेड्यातील शेतकर्याने दाखल केली. आपल्या १७ वर्षे १० महिने १५ दिवस वयाच्या मुलीला २७ मार्च रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान लोणखेडा येथून फुस लावून पळवून नेल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. तीन दिवसांनंतरही मुलगी घरी न परतल्याने अखेर वडिलांनी पोलिस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद नोंदवली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलिस नाईक अविनाश कोकणी करीत आहेत.



