नंदुरबार जिल्हा

‘वीर में वीर, जय महावीर’ : शहाद्यात भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य ‘वरघोडा’ मिरवणूक; धार्मिक उत्साहात न्‍हाऊन निघाले शहर

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सत्‍य, अहिंसा आणि करुणा यांचे सर्वोच्‍च प्रतिक मानले जाणारे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती शहादा शहरात अतिशय उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. भगवान महावीर जयंतीनिमित्त शहादा शहरात भव्य ‘वरघोडा’ मिरवणूक काढण्यात आली. जुनी पोस्ट गल्लीतील भगवान महावीर मंदिरात सकाळी मूर्ती पूजन, आरती व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भगवान महावीरांच्या मूर्तीला अश्व रथावर विराजमान करून शहरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
‘वीर में वीर जय महावीर व भगवान महावीर की जय” अशा जयघोषात ही मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत होती. सहा वाद्यांच्या गजरात धार्मिक गीते, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मिरवणूक मेन रोड, हुतात्मा लालदास चौक, टिळक चौक, महात्मा गांधी चौक, गुजर गल्ली, जुना प्रकाशा रोड, बाजार परिसर, जनता चौक, चार रस्ता, न्यायालय परिसर आदी मार्गांवरून डोंगरगाव रस्त्यावरील सुबोध घंटा मंदिर (दादा वाडी) येथे जाऊन विसर्जित करण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी जैन बांधवांकडून भगवान महावीरांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच रस्त्यावर शुद्ध जल व गायीचे दूध अर्पण करून भक्तीभाव व्यक्त करण्यात आला. महिलांनी धार्मिक गीतांवर सामूहिक गरबा नृत्य सादर करत वातावरण अधिक उत्साही केले. लहान मुलांपासून ते ज्‍येष्‍ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या सोहळ्यात सुमतीलाल खिंवसरा, विजय चोपडा, रमेश चोरडिया, विलास खिंवसरा, रमेश छाजेड, भरत ओसवाल, समीर जैन, मोतीलाल जैन, राजेंद्र जैन, ललित छाजेड, मनोज जैन, गुड्डू नहाटा, मयूर चोरडिया, प्रदीप देसरडा, सिद्धेश कोटडिया, विनय कोटडिया, भवरलाल जैन, विनोद जैन, दिलीप जैन, प्रदीप टाटिया, फुलचंद लोढा, कल्पेश खिंवसरा, सौरभ खिंवसरा, गिरीश कोठडिया, विनय गांधी, हेमल गांधी, अनिल छाजेड, समीर टाटिया आदींसह मोठ्या संख्येने जैन बांधव, महिला, युवक-युवती सहभागी झाले होते.
शहादा शहरातील मूर्तिपूजक जैन संघ, समता युवा संघ, वर्धमान स्थानक जैन संघ तसेच तेरापंथी जैन युवक परिषद यांच्या पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. यावेळी श्री महावीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक समीर जैन यांनी भगवान महावीरांच्या शिकवणींचे महत्त्व सांगताना अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह या पंचमहाव्रतांचा समाजजीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले. “या तत्त्वांमुळे मानसिक शांती, सामाजिक सौहार्द आणि संतुलित जीवन शक्य होते,” असे त्यांनी नमूद केले. भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित या मिरवणुकीमुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button