नंदुरबार जिल्हा

वादळी वारा, गारपिटीने शेती उद्‍ध्‍वस्‍त, शेतकर्‍यांच्‍या डोळ्‍यात पाणी; डॉ. हिना गावित प्रत्‍यक्ष, तर माजी मंत्री डॉ. गावित व्‍हीडिओ कॉलद्वारे पोहोचले बांधावर

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ, तलवाडे, इंद्रीहट्टी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून मका, गहू आणि पपई या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्‍या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी तत्‍काळ प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. याचवेळी माजी मंत्री आ. विजयकुमार गावित यांनी रुग्‍णालयातून व्‍हीडिओ कॉलद्वारे शेतकर्‍यांशी संवाद साधत त्‍यांचे अश्रू पुसून दिलासा दिला.
हवामान विभागाने दिलेल्‍या इशार्‍यानुसार सोमवारी (दि. ३०) नंदुरबार जिल्‍ह्याच्‍या पूर्व भागाला वादळी वार्‍यासह बरसलेल्‍या धुवाँधार पावसाने झोडपून काढले. यावेळी शनिमांडळ परिसरात गोटीच्‍या आकाराच्‍या जोरदार गाराही बरसल्‍या. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून मका, गहू आणि पपई या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
यानंतर माजी खा. डॉ. हिना गावित यांनी मंगळवारी सकाळीच या भागाला भेट देत बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी केली.
“या गंभीर नुकसानीबाबत राज्य शासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल”, अशा शब्‍दांत शेतकर्‍यांना धीर दिला. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आ. डॉ. गावितांचा व्‍हीडिओ कॉलद्वारे संवाद
दरम्यान, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी रुग्णालयातूनच व्हिडिओ कॉलद्वारे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकर्‍यांशी संवाद साधला. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button