राजकारण

शहाद्यात पाटील विरूद्ध पाटील राजकीय वाक्‌युद्ध थांबेना; नगराध्‍यक्ष म्‍हणाले, ‘बालिशपणा’ सोडा; उपनगराध्‍यक्षांचा पलटवार, म्‍हणाल्‍या, अभद्र वर्तन नगराध्‍यक्षपदाला शोभत नाही!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा शहरात सध्‍या नगराध्‍यक्ष अभिजित पाटील विरूद्ध उपनगराध्‍यक्ष माधवी मकरंद पाटील यांच्‍यातील राजकीय आरोप-प्रत्‍यारोप थांबायचे नाव घेत नसल्‍याचे दिसत आहे. पालिकेच्‍या सर्वसाधारण सभेत पत्रकारांच्‍या प्रवेशावरून आमनेसामने आलेल्‍या या दोन्‍ही नेत्‍यांत आता सभा संपल्‍यावरही आरोप-प्रत्‍यारोपांचा सामना रंगला आहे.
शहादा नगर पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. ३०) पार पडली. मागील सभेच्‍या इतिवृत्ताचा विषय विषयपत्रिकेवर नसल्‍याने ही सभा गोंधळामुळे अवघ्‍या अर्ध्या तासात आटोपली होती. या सभेत उपनगराध्‍यक्षा माधवी पाटील यांच्‍यासह भाजपच्‍या सदस्‍यांनी नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांच्‍यासह मुख्‍याधिकारी साजिद पिंजारी यांना टार्गेट केले होते. यावेळी या सर्वांनीच नगराध्‍यक्षांवर विविध विषयांच्‍या अनुषंगाने आरोप केले होते. मुख्‍याधिकार्‍यांच्‍या दालनातही नगराध्‍यक्ष व भाजपच्‍या सदस्‍यांमध्‍ये खडाजंगी झाली होती.
विरोधकांच्‍या असहकार्यामुळे शहराच्‍या विकासात अडथळा : अभिजित पाटील
यानंतर नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी या विषयाच्‍या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधला. ते म्‍हणाले, काही तांत्रिक अडचणींमुळे मागील सभेच्‍या इतिवृत्ताच्‍या वाचनाचा विषय यावेळच्‍या सभेच्‍या विषयपत्रिकेवर घ्‍यायचा राहिला, हे मान्‍य आहे. मात्र, एका विषय समिती सभापतींनी आम्‍हाला नगराध्‍यक्षांची गरज नाही, अशी भाषा वापरली. अशी भाषा वापरणे ही दूर्दैवी बाब आहे. खरे तर हा बालिशपणा सुरू आहे की काय, अशी भीती माझ्‍या मनात निर्माण झाली आहे. मला शहादावासीयांनी नगराध्‍यक्ष म्‍हणून निवडून दिले आहे. पण विरोधकांनी अशी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली तर शहाद्याच्‍या विकासात नक्‍कीच अडचणी येत राहतील. काही तांत्रिक बाबी राहिल्‍या असतील, तर त्‍यात सुधारणा केली जावू शकते. पण विरोधी सदस्‍यांनी बालिशपणा सोडून परस्‍परांशी सुसंवाद साधण्‍याची गरज आहे. विरोधकांनी सामंजस्‍य दाखवून योग्‍य मागणी केली तर ते म्‍हणतील तेव्‍हा, त्‍या ठिकाणी आणि त्‍या वेळेत पुन्‍हा सर्वसाधारण सभा घेण्‍याची आमची तयारी आहे, असे नगराध्‍यक्ष पाटील म्‍हणाले. आ. राजेश पाडवी यांनी या विषयात मध्‍यस्‍थी करावी, अशी विनंतही यावेळी पाटील यांनी केली.
दिशाभूल करणे थांबवा : माधवी पाटील यांचा पलटवार
नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांच्‍यावर उपनगराध्‍यक्षा माधवी पाटील यांनी पुन्‍हा एकदा पलटवार केला. त्‍या म्‍हणाल्‍या, पत्रकारांना सर्वसाधारण सभेत प्रवेश द्यावा, अशी मागणी करणारे पत्र मी शुक्रवारी मुख्‍याधिकार्‍यांना दिले होते. त्‍यात नगराध्‍यक्षांच्‍या नावाचा उल्‍लेखही केला नव्‍हता. तरीही ते का अस्‍वस्‍थ होत आहेत, हे समजत नाही. मागे त्‍यांनी मी (माधवी पाटील) नवीन असल्‍याचे म्‍हटले होते. गेल्‍या ३२ वर्षांपसून मी शहाद्यात राहत असल्‍याने येथील सर्व बाबी मला माहिती आहेत. मी नवीन असल्‍याचे सांगत काहीतरी थोपवायचा उद्योग नगराध्‍यक्षांकडून सुरू आहे. पण यात काही अर्थ नाही. मागील निवडणुकीवेळी विद्यमान नगराध्‍यक्षांनी माजी नगराध्‍यक्षांचे मेडियेटर म्‍हणून काम केले आहे. याचा अर्थ त्‍यांना सगळे व्‍यवस्‍थित माहिती आहे. असे असताना ते इतिवृत्ताचा विषय घेण्‍यात तांत्रिक चूक झाली असे म्‍हणत असतील कसे मान्‍य करता येईल.
नगराध्‍यक्ष झाले त्‍यादिवशी विद्यमान नगराध्‍यक्षांनी केलेले वर्तन अभद्र स्‍वरूपाचे होते. हे पदाला शोभणारे नव्‍हते. असे असताना ते माझ्‍यावर आता पोरकटपणाचे आरोप करीत आहेत. खरा पोरकटपणा कोण करीत आहे, हे जनता बघत आहे, असेही माधवी पाटील म्‍हणाल्‍या. स्‍थायी समिती, विषय समित्‍यांमध्‍ये पत्रकारांना का बोलावत नाही, असा प्रश्‍न नगराध्‍यक्ष आम्‍हाला करीत आहेत. पण ते पत्रकारांना सर्वसाधारण सभेत बोलावणार नाहीत, तर आम्‍ही विषय समित्‍यांच्‍या बैठकांना कसे बोलावणार असा प्रश्‍न करीत माधवी पाटील यांनी नगराध्‍यक्षांकडून केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचे काम सुरू आहे, असा आरोपही केला. आम्‍ही सहकार्य करीत नाहीत, अशा चुकीच्‍या गोष्‍टी नगराध्‍यक्ष लोकांमध्‍ये सांगत सुटले असून, ही बाबच मुळात चुकीची असून, आमची चांगल्‍या गोष्‍टींना सहकार्य करण्‍याची तयारी असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button