नंदुरबार जिल्हा

शहाद्यातील खुल्‍या जागांवर भूमाफियांचा डल्‍ला; सार्वजनिक जागांवर अतिक्रमण, शेड उभारून खुलेआम खासगी वापर सुरू; पालिका मात्र ‘गांधारी’च्‍या भूमिकेत

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा नगर परिषदेचे पदाधिकारी परस्‍परांवर आरोप- प्रत्‍यारोप करीत राजकारणात गुंतल्‍याचा गैरफायदा भूमाफिया घेत असल्‍याची धक्‍कादायक वास्‍तव समोर आले आहे. शहरातील नागरिकांच्‍या सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवलेल्या ‘ओपन प्लेस’वर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून, अनेक ठिकाणी काही जणांनी या खुल्या जागांवर थेट पत्र्याचे शेड उभारून त्या जागा स्‍वत:च्‍या असल्‍याप्रमाणे त्‍यांचा वापर सुरू केला आहे. सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या जागांचा सर्रास खासगी वापर होत असल्‍याचे दिसत असूनही कोणतीही कारवाई होत नसल्‍याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॉम्बनीसह शहरातील विविध भागांमध्ये काही नागरिकांनी ‘ओपन प्लेस’भोवती कंपाऊंड वॉल उभारून जागा बळकावली आहे. काही ठिकाणी तर चक्क शेड बांधून त्या जागांचा व्यावसायिक किंवा वैयक्तिक वापर केला जात आहे. या प्रकारामुळे नगर परिषदेच्या अधिकारालाच खुले आव्हान दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढल्याचा आरोप स्‍थानिकांकडून केला जात आहे. ‘ओपन प्लेस’वर उघडपणे अतिक्रमण होत असतानाही प्रशासन ‘गांधारी’ची भूमिका घेत असल्याची टीका होत आहे. या अनधिकृत शेड उभारणीमागे पालिकेचे सेटलमेंट तर नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
एकीकडे काही ‘ओपन प्लेस’ विकसित करण्यासाठी निधी खर्च केला जात असताना, दुसरीकडे अनेक जागा ओसाड पडल्या आहेत किंवा अतिक्रमण करून खासगी वापरासाठी वळवल्या गेल्या आहेत. परिणामी नागरिकांना खेळाचे मैदान, व्यायामशाळा, सांस्कृतिक उपक्रम, वृक्षारोपण यांसारख्या मूलभूत सुविधा मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
शहरातील वृंदावन नगर, सरस्वती नगर यांसारख्या भागांत अतिक्रमणाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर येत आहे. या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून जागेचा वापर सुरू असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
शहरातील ‘ओपन प्लेस’ या नागरिकांच्या सामूहिक हितासाठी राखीव असतात. या जागांवर अतिक्रमण होणे म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर गदा येणे होय. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून अतिक्रमण हटवावे आणि शहरातील सर्व ‘ओपन प्लेस’ अतिक्रमणमुक्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. आता या गंभीर प्रश्नावर पालिका प्रशासन कधी आणि कशी कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button