गुन्हे वार्ता

शहाद्यात अवैध स्‍पिरीट वाहतुकीचा पर्दाफाश; एलसीबीची बेधडक कारवाई, पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्‍त; एकाला बेड्या, दुसरा पळाला

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : धुळे जिल्‍ह्यातील शिरपूरहून धडगावकडे निघालेल्‍या वाहनासह स्‍पिरीटचा मोठा साठा जप्‍त करण्‍यात नंदुरबार जिल्‍हा पोलिस दलाच्‍या गुन्‍हे अन्‍वेषण शाखेला (एलसीबी) यश आले आहे. शहादा शहरातील मामाचे मोहिदा चौफुलीवर करण्‍यात आलेल्‍या या कारवाईत ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्‍यात आला. यावेळी या स्‍पिरीटची वाहतूक करणार्‍या वाहनातील एकाला बेड्या ठोकण्‍यात एलसीबीला यश आले असले तरी एकाने मात्र अंधाराचा गैरफायदा घेत धूम ठोकण्‍यात यश मिळविले.
दारू तयार करण्‍यासाठी लागणार्‍या स्‍पिरीटचा साठा घेऊन एक बोलेरो वाहन (एमएच ०४ ईएस ९६५१) शिरपूर येथून कहाटुळमार्गे धडगावकडे जात असल्‍याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्‍यानुसार एलसीबीच्‍या पथकाने शहादा शहरातील मामाचे मोहिदा चौफुलीवर सापळा रचला. संध्‍याकाळी उशीरा संशयित वाहन येताना दिसताच एलसीबीच्‍या कर्मचार्‍यांनी हे वाहन अडवून चालकाची चौकशी सुरू केली. त्‍याने उडवाउडवीची उत्तरे दिल्‍याने संशय आल्‍याने एलसीबी कर्मचार्‍यांनी वाहनाची तपासणी सुरू केली. यावेळी वाहनात तब्‍बल ५५० लिटर स्‍पिरीटचा (दारू तयार करण्‍यासाठी वापरात येणारे रसायन) साठा आढळला. यावेळी पोलिसांनी हे स्‍पिरीट आणि वाहन असा सुमारे ८ लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला.
यावेळी एलसीबी कर्मचार्‍यांनी वाहनातील वसंत कुसाल पावरा (रा. बिलगाव, ता. धडगाव) याला ताब्‍यात घेतले. याचवेळी अंधाराचा गैरफायदा घेत त्‍याच्‍या सहकार्‍याने मात्र धूम ठोकली. या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्‍यात महाराष्‍ट्र दारूबंदी कायद्याच्‍या कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३ अन्‍वये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून, पुढील तपास शहादा पोलिस करीत आहेत.
या पथकाने केली कारवाई
जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हेड कॉन्‍स्‍टेबल पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, जितेंद्र पाडवी, पोलिस नाईक विकास कापुरे, कॉन्‍स्‍टेबल शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले आदींच्‍या पथकाने ही कारवाई केली.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button