क्रुरतेचा कळस : नौदलाच्या जवानाने केले प्रेयसीचे तुकडे; धड फ्रिजमध्ये ठेवून डोके, हात निर्जनस्थळी जाळले; श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती

विशाखापट्टणम (वृत्तसंस्था / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : २०२२ मध्ये देशाच्या राजधानीत झालेल्या श्रद्धा वालकरच्या खुनाची पुनरावृत्ती आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये झाली आहे. येथे नौदलाच्या एका जवानाचे क्रूरकर्म्यालाही लाजवेल असे निर्दयी कृत्य समोर आले आहे. या जवानाने आपल्याच प्रेयसीचा खून केल्यावर तिच्या शरीराचे तुकडे केले. क्रुरतेचा कळस म्हणजे खुनानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून त्यातील काही भाग प्लास्टिकच्या बॅगेत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर काही भाग बॅगमध्ये भरून निर्जनस्थळी नेत जाळून टाकला. विशेष म्हणजे या खुनानंतर जवानाने स्वत: पोलिस ठाणे गाठून आपल्या कृत्याची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंताडा रवींद्र (३०) असे या क्रुरकर्मा जवानाचे तर पोलिपल्ली मौनिका असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. चिंताडा रवींद्र हा आयएनएस देगा या जहाजावर तैनात होता. पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून त्याने रविवारी दुपारी ३१ वर्षीय प्रेयसी मौनिकाला घरी बोलावले. तेथे त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यात वाद झाला. यानंतर रागाच्या भरात रवींद्रने मौनिकाला गळा दाबून ठार गेले. नंतर तिच्या शरीराचे चाकूने तुकडे केले. आपल्या हातून भयानक कृत्य झाल्याची उपरती झाल्यावर त्याने पोलिस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.
पाच वर्षांपूर्वी ओळख मग वाढत गेले संबंध
रवींद्र व मौनिका यांची ओळख २०२१ मध्ये ‘मिंगल’ या डेटिंग ॲपवर झाली होती. पुढे हे दोघे प्रत्यक्षात भेटले. नंतर दोघे विशाखापट्टणममधील विविध ठिकाणी (उद्याने, चित्रपटगृहे) वारंवार भेटत. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोन आठवड्यांपूर्वी रवींद्रची पत्नी विझियानगरम येथील माहेरी गेली होती. प्रेयसीसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हीच सर्वोत्तम संधी असल्याचे पाहून रवींद्रने रविवारी दुपारी मौनिकाला आपल्या घरी बोलावले. तेथे बराच वेळ एकत्र घालवल्यानंतर सायंकाळी त्यांच्यात कथितरित्या वाद झाला आणि रवींद्रने मौनिकाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने एका ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून चाकू मागवून मृतदेहाचे तुकडे केले. प्राथमिक तपासानुसार, रवींद्रने मृतदेहाच्या धडापासून डोके, पाय आणि हात वेगळे केले. त्याने पाय आणि कमरेचा भाग एका ट्रॉली बॅगेत भरला, धड फ्रीजमध्ये ठेवले आणि डोके व हात दुसऱ्या एका ठिकाणी नेले, जिथे त्याने ते जाळून टाकल्याचा आरोप आहे.
पोलिस ठाण्यात गेल्यानंतर रवींद्रने गुन्ह्याची कबुली देताना दावा केला की, प्रेमसंबंधांच्या काळात मौनिकाने त्याच्याकडून ३.५ लाख रुपये घेतले होते आणि ती वारंवार त्यांचे संबंध पत्नीला सांगण्याची धमकी देत होती. याच कारणामुळे त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत. रविवारीही तसाच वाद झाला आणि यातून आपल्या हातून तिचा खून झाला.
फ्रीजमध्ये आढळले मौनिकाच्या शरीराचे तुकडे
मात्र, रवींद्रने या खुनाचा कट आधीच रचला होता. कारण २०२४ मध्ये दुसऱ्या एका महिलेशी लग्न केल्यापासून, मौनिकाकडून होणाऱ्या सततच्या छळाला आणि धमक्यांना तो कंटाळला होता, असे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्यांना फ्रीजमध्ये आणि घराच्या इतर भागात मृतदेहाचे कापलेले तुकडे आढळून आले. मात्र, मौनिकाचे डोके तिथे नव्हते. रवींद्रने ते निर्जनस्थळी नेवून जाळल्याचा पोलिसांना संशय आहे. मृतदेहाचे बेपत्ता झालेले अवयव शोधण्यासाठी आता पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
श्रद्धा वालकर खुनाची पुनरावृत्ती
मौनिका पोलिपल्ली खुनाचे प्रकरण १८ मे २०२२ रोजी नवी दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकरच्या क्रूर हत्येची आठवण करून देणारे आहे. दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरचा तिचा ‘लिव्ह-इन पार्टनर’ आफताब अमीन पूनावाला याने गळा दाबून खून केल्याचे उघड झाले होते. त्याने श्रद्धाला मारल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते कापलेले अवयव एका फ्रीजमध्ये भरून ठेवले होते; त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने हे तुकडे दिल्लीच्या विविध भागांमध्ये अनेक दिवसांच्या कालावधीत नेऊन विखुरले होते, असा त्याच्यावर आरोप आहे.



