नंदुरबार जिल्हा

आधीच बिबट्याने केले हैराण, त्‍यात आता अस्‍वलही अवतरले; तळोद्याच्‍या चांदसैली घाटात दर्शनाने वाहनधारकांत धास्‍ती

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यात नरभक्षक बिबट्यांनी शेतकर्‍यांचे जगणे मुश्‍किल केले असून, त्‍यातच आता तळोदा तालुक्‍यात तळोदा-धडगाव रस्‍त्‍यावरील चांदसैली घाटात अस्‍वलाने दर्शन दिल्‍याने शेतकर्‍यांपाठोपाठ स्‍थानिक रहिवांशासह वाहनधारकांमध्‍ये धास्‍तीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्‍त्‍यावर मुक्‍तसंचार करणार्‍या या अस्‍वालाचे छायाचित्र एका वाहनधारकाने आपल्‍या मोबाईल कॅमेर्‍यात टिपले आहे.
सातपुड्यातील प्रसिद्ध असलेला चांदसैली सेहली घाट परिसरात वन्यजीवांची वर्दळ वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. शासकीय कंत्राटदार राकेश पावरा हे धडगाव येथून तळोदा कडे परतताना अस्वलाचे दर्शन झाले असून त्यांनी हा प्रसंग मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. ही घटना माकड टेकडीच्या आधी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश पावरा हे कामानिमित्त घाटमार्गाने परतत असताना रस्त्यावर अचानक अस्वल फिरताना दिसले. काही वेळ हे अस्‍वल रस्त्यावरच भटकंती करत होते. दरम्यान त्यांनी सुरक्षित अंतर राखत या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
सातपुडा पर्वतरांगांमध्‍ये घनदाट जंगल आणि नैसर्गिक अधिवास असल्‍यामुळे अस्‍वल, बिबट्या, तरस, लांडगा आदी वन्‍यप्राण्‍यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. विशेषत: चांदसैली घाट परिसर हा दाट जंगलाने व्‍यापलेला असल्‍याने रात्रीच्‍या वेळी वन्‍यप्राणी रस्‍त्‍यावर येण्‍याच्‍या घटना अधूनमधून घडत असतात. यापूर्वीही काही वन्‍यप्राण्‍यांनी रस्‍त्‍यावर येऊन वाहनधारकांना दर्शन दिल्‍याचे प्रकार घडले आहेत.
दरम्‍यान, आता अस्‍वल रस्‍त्‍यावर फिरताना दिसल्‍याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी घाटमार्गाने प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वन विभागानेही या भागात गस्त वाढवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अशा घटना वाढत असल्याने वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button