प्रकाशानजीक टोळक्याची गुंडगिरी; आधी गाडी आडवी लावली मग शिविगाळ करीत बसचालक, वाहक-प्रवाशाला चोपले

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्यात बस पुढे जावू शकणार नाही, अशा पद्धतीने गाडी लावणार्या वाहनचालकास ती गाडी मागे घेण्याची विनंती केल्यावर त्या वाहनातून उतरून आठ ते दहा जणांनी बस चालकाला शिविगाळ करीत वाहकासह एका प्रवाशाला मारहाण केल्याचा प्रकार शहादा तालुक्यातील धुरखेडा ते प्रकाशा मार्गावर घडली. या प्रकरणी सर्व आरोपींवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर (जि. जळगाव) डेपोची पुणे – अक्कलकुवा बस (एमएच १४ एमएच २९८६) शनिवारी शहादा तालुक्यातील धुरखेडा ते प्रकाशा मार्गावरून अक्कलकुवाकडे मार्गक्रमण करीत होती. सकाळी १०.४५ च्या सुमारास याच मार्गावरून विरूद्ध दिशेने येणार्या आयशर (आरजे ११ जीसी ८४१६) चालकाने आपले वाहन या बसच्या समोर आणले. यामुळे बसला पुढे जाण्यासाठी मार्ग उरला नाही.
यावेळी बसचालकाने आयशरच्या चालकास थोडी गाडी बाजूला घ्यावी, अशी विनंती केली. मात्र, आयशर चालकाने त्यास नकार देत बसचालकाशी वाद घालण्यास सुरूवात केली. ‘तुझ्या बापाचा रस्ता आहे का, आम्ही गाडी मागे घेणार नाही’, अशा शब्दांत बसचालकला दरडावत शिविगाळ सुरू केली.
यावेळी वाहक गणेश महारू सोनवणे यांनी संबंधित आयशरच्या चालकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी आयशरमधून प्रवास करणारे आठ ते दहा मजूर खाली उतरले. त्यांनी लगेच बसचालक आणि वाहक यांना मारहाण सुरू केली. याच दरम्यान बसमधील प्रवासी कृष्णा रमेश वळवी यांनी खाली उतरून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजूर त्यांच्यावरही तुटून पडले आणि त्यांच्यावरही लाथाबुक्क्यांचे प्रहार सुरू केले. यामध्ये बसचालक, वाहक आणि प्रवासी हे तिघेही जखमी झाले. तशाच अवस्थेत नंतर बसचालकाने बस पुढे नेली.
अखेर रविवारी या प्रकरणी बसवाहक गणेश सोनवणे यांनी शहादा पोलिस ठाणे गाठून मजुरांच्या आठ ते दहा जणांच्या (नावे माहिती नाहीत) टोळीविरोधात फिर्याद नोंदवली. यावरून शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिस हेडकॉन्स्टेबल मेहेरसिंग वळवी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



