महागाईने वृत्तपत्र क्षेत्राचे कंबरडे मोडले; शहाद्याच्या पत्रकारांचे १५० टक्के जाहिरात दरवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील वृत्तपत्र उद्योगासमोरील आर्थिक संकट आणि वाढती महागाई लक्षात घेता, शासकीय जाहिरात दरांमध्ये तात्काळ १५० टक्के वाढ करावी, या मुख्य मागणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर सुरू असलेल्या लाक्षणिक आंदोलनाचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, २०१९ पासून कागद, शाई, वीज आणि मनुष्यबळाच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, शासनाकडून मिळणाऱ्या जाहिरातींचे दर आजही जुन्याच दरांवर अवलंबून आहेत. यामुळे राज्यातील विशेषतः लघु आणि मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असून, अनेक दैनिकांवर बंद पडण्याची वेळ आली आहे. यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात आला आहे.
या आहेत मागण्या
पत्रकार आणि वृत्तपत्र मालकांच्या हितासाठी निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यात महागाई निर्देशांकानुसार जाहिरात दरात १५०% वाढ तातडीने मंजूर करावी, शासकीय ई-टेंडर नोटिसेस संक्षिप्त न छापता त्या पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात, वृत्तपत्रांना आर्थिक आधार मिळावा यासाठी किमान आकार: जाहिरातींचा किमान आकार २०० चौ.से. निश्चित करावा, जाहिरातींची बिले ३० दिवसांच्या आत अदा करावीत, विलंब झाल्यास व्याजासह रक्कम मिळावी, १० वर्षे सेवा करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यावी आणि शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन योजनेच्या अटी शिथिल करून ५५ वर्षे वय व २० वर्षे अनुभव असलेल्यांना लाभ द्यावा, अशा मागण्यांचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय कार्यालये माहिती खात्याला डावलून परस्पर काही ठराविक वृत्तपत्रांना जाहिराती देतात. ही पद्धत बंद करून सर्व जाहिराती माहिती व जनसंपर्क विभागामार्फतच द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. २५ वर्षे पूर्ण झालेल्या वृत्तपत्रांना त्यांची प्रलंबित ‘नैसर्गिक दरवाढ’ तत्काळ लागू करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
निवेदनावर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा अध्यक्ष रमाकांत पाटील, उपाध्यक्ष हिरालाल रोकडे, जिल्हा संघटक प्रा. नेत्रदीपक कुवर, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, ईश्वर पाटील, विष्णू जोंधळे, बापू घोडराज, हर्षल सोनवणे, सलाउद्दीन लोहार, विजय निकम, कृष्णा कोळी, संजय मोहिते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



