शेतकरी महिलेला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न; तुरीत पाणी सोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून कृत्य, नवापूर तालुक्यातील धक्कादायक घटना

विसरवाडी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : कापणी गेल्यानंतर गोळा करून ठेवलेल्या तुरीमध्ये पाणी सोडल्याचा जाब विचारणार्या शेतकरी महिलेला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना नवापूर तालुक्यातील विसरवाडीनजीकच्या केळी गाव शिवारातील शेतात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील बंधारपाडा (पाटीलफळी) येथील सुनील दिलीप गावित यांची केळी गाव शिवारात शेती आहे. यंदा त्यांनी या शेतात तुरीची लागवड केली होती. या पिकाची त्यांनी नुकतीच कापणी केली होती. कापणी केलेली तुरी त्यांनी शेतातच गोळा करून ठेवली होती. त्यांच्याच गावातील वारसिंग पाच्या गावित याने या तुरीत पाणी सोडून ती भिजवली होती.
सुनील व त्याची आई चंपाबाई (५३) यांनी वारसिंग याला या कृत्याचा जाब विचारला. याचा राग वारसिंग याला आला होता. २५ मार्च रोजी त्याने सुनील गावित यांच्या शेतात जावून तेथे काम करणार्या चंपाबाई दिलीप गावित यांच्याशी वाद घातला. यानंतर वारसिंग याने सोबत आणलेली विषाची बाटली काढून ते बळजबरी करून चंपाबाई यांना पाजून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब कळल्यानंतर सुनील याने आईला उपचारसाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, २९ मार्च रोजी या प्रकरणी सुनील गावित याने वारसिंगविरोधात विसरवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरून वारसिंग याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक देविदास वडघुले पुढील तपास करीत आहेत.



