शहादा न.प.च्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ; अर्ध्या तासात संपली सभा; नगराध्यक्ष, मुख्याधिकारी भाजपकडून टार्गेट

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पत्रकारांच्या प्रवेशावरून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी परस्परांवर ‘पोरकटपणा’चे आरोप केल्यामुळे आधीच चर्चेत आलेली शहादा नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी अपेक्षेप्रमाणे गोंधळाने गाजली. प्रत्येक विषय निघाल्यानंतर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपनगरध्यक्षांसह भाजपच्या सदस्यांच्या टार्गेटवर असल्याचे चित्र या सभेत दिसून आले. तर नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदारीचे पालन करीत नसल्याचा आरोप भाजपच्या सदस्यांकडून केला गेला.
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.३०) दुपारी बारा वाजता पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अभिजीत पाटील होते, यावेळी उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध विभागप्रमुख सभागृहात उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी गत काही दिवसात मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. नगराध्यक्षांच्या सूचनेने सभेला प्रारंभ करण्यात आला. मात्र या सभेच्या विषयपत्रिकेवर गतसभेतील इतिवृत्त वाचन करून त्यास मंजूरी देण्याचा विषय नसल्याने भाजपचे प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी यांनी पहिला विषय इतिवृत्त वाचनाचा असावा तसेच सभा दुपारी दोन वाजता घ्यावी आणि सभेचा अजेंडा व टिपणी सर्व सदस्यांना वेळेवर मिळावी, अशी मागणी करीत तोपर्यंत ही सभा स्थगित करावी, अशी सूचना केली. याचवेळी उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील यांनी गत १२ तारखेच्या सभेतील प्रोसिडिंग मागणी करूनही अद्याप मिळालेले नाही तसेच आजच्या सर्वसाधारण सभेची विषयनिहाय टिपणीचे योग्य आकलन होत नसल्याने सभा तहकूब करावी, अशी सूचना केली. त्याच वेळी बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी स्थायी व बांधकाम समितीच्या सभेत झालेले विषय विषय पत्रिकेत घ्यावे तसेच नगरपालिकेला शासनाकडून येणारे जीआर सभासदांना वेळीच पोचवावेत, अशी सूचना केली.
नगरसेवक ललित छाजेड यांनी एक तारखेच्या आत टिप्पणी तयार करून द्यावी तसेच मागील प्रोसिडिंगही युद्ध पातळीवर उपलब्ध करून द्यावे आणि पुढील सभा ४ एप्रिलच्या आत घ्यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, मुख्याधिकारी यांना मोबाईलवर फोन आल्याने ते सुमारे दहा मिनिट सभागृहाबाहेर गेले. तद्नंतर नगरसेवक मुनेशचंद्र जगदेव यांनी विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ९ व ५६ याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना जोरदार शब्दांत जाब विचारत जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
प्रोसिडिंग लिहिणे तसेच अजेंडा व टिप्पणी बाबतची जबाबदारी संबंधित सभा लिपिक व अधिकाऱ्यांपेक्षा त्यावर स्वाक्षरी करणारे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांची अधिक आहे, अशी प्रतिक्रियाही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केली.
६२ विषय, पण अर्ध्या तासात सगळे जिकडेतिकडे
आजच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर ६२ विषय घेण्यात आले होते. मात्र, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे हा विषय विषयपत्रिकेत नसल्याने विरोधी पक्षाच्या गटनेत्या माधवी पाटील व प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह २० नगरसेवकांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना देण्यात आले. सुमारे २५-३० मिनिटे सभा चालली, राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही भाजपच्या आठही सदस्यांनी इतिवृत्त वाचन करून मंजूर करण्याचा विषय नसल्याने तो समाविष्ट करून नवीन अजेंडा सदस्यांना द्यावा असे पत्र दिले.
दरम्यान, मुख्याधिकारी कक्षात नगराध्यक्ष व विरोधी भाजपच्या सदस्यांत विकास कामे झाली पाहिजेत यावरून जोरदार खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे.
उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांचा आरोप
पालिकेत २९ पैकी भाजपचे २० निवडून आलेले व २ स्वीकृत असे २२ नगरसेवक असून आमचे विविध विषय समिती सभापती आहेत. आम्ही शहर विकासाला बांधील आहोत. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी अजेंडा व टिपणी देताना त्यात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. ती त्यांची जबाबदारी आहे. गत सभेचे प्रोसिडिंग सदस्यांना वेळेवर देणे ही नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, हे दोघेही ती जबाबदारी पार पात नाहीत, असा आरोप आजच्या सर्वसाधारण सभेनंतर उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी केला. आपण गटनेता म्हणून पालिका प्रशासनास सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहोत मात्र, कामकाजात पारदर्शकता असणे अपेक्षित आहे, असेही त्या म्हणाल्या.



