नंदुरबार तालुक्याला अवकाळीचा तडाखा; शनिमांडळ परिसरात गाराही बरसल्या; अवेळी बरसलेल्या पावसाने पिकांना फटका

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : खानदेशात अवकाळी पाऊस पडण्याची व्यक्त करण्यात आलेला अंदाज नंदुरबार जिल्ह्यात खरा ठरला. नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ व परिसरातील गावांना सोमवारी (दि. ३०) अवकाळी पावसाने झोडपून काढले. दुपारनंतर अचानक बदललेल्या वातावरणामुळे या भागात गारपीटीसह जोरदार पावसाची नोंद झाली.
राज्यातील काही भागांत तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यानुसार, सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात दिवसभर असह्य उकाडा व दमट वातावरण जाणवत होते. मात्र, सायंकाळी चार वाजेच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषतः नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिमांडळ व परिसरातील गावांमध्ये गारपीटीमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गारांचा आकार जवळपास गोटीएवढा मोठा होता.
या अवकाळी पावसामुळे कांद्यासह इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून, यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन दिवस जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



