दी बर्निंग डंपर : टायर फुटले अन् आग लागून डंपरचा झाला कोळसा; नंदुरबारच्या कोळदाजवळ भीषण दुर्घटना, सुदैवाने जीवितहानी टळली

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार तालुक्यातील कोळदा परिसराने सोमवारी (दि. २९) रात्री ‘दी बर्निंग डंपर’चा थरार अनुभवला. कोळदा परिसरात सोमवारी रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भीषण घटना घडली. वाळू भरून जात असलेल्या दहा चाकी डंपरचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यानंतर काही क्षणांतच डंपरने पेट घेतल्याने संपूर्ण वाहन आगीत भस्मसात झाले.
डंपरला आग लागल्यानंतर मोठ्या आवाजात टायर फुटू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आवाज आणि आगीच्या ज्वाळांमुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत त्वरित घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नंदुरबार पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग लवकरच नियंत्रणात आणण्यात आली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे आणि प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.



