तळोदा तालुक्यात आरोग्य यंत्रणेची ऐशीतैशी; आश्रमशाळांचे विद्यार्थी आले उपचाराला, पण कुणीच नाही लक्ष द्यायला; प्रतापपूर पीएचसीतील धक्कादायक प्रकार

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. धडगाव तालुक्यात आरोग्य यंत्रणेच्या नावावर टिच्चून लोकांच्या आरोग्याशी खेळणार्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश होत नाही तोच तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपूर्वी प्रतापपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्यांअभावी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना उपचाराअभावी ताटकळत बसावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही बाब कळल्यानंतर खुद्द जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी उपस्थित कर्मचार्यांना विद्यार्थ्यांना वेळेवर उपचार करण्याचे आदेश देऊनही काहीही फरक पडला नसल्याचे वृत्त आहे.
प्रतापपूर आरोग्य केंद्रात नेहमीच उपचारासाठी परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र, या रुग्णालयात पुरेशी कर्मचारी संख्या नसल्याने बहुतांश वेळा रुग्णांना उपचारासाठी वाट पाहावी लागते. शनिवारी तर या अपुर्या कर्मचारी संख्येचा फटका आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागला.
कोठार व राणीपूर आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना कोठार आश्रम शाळेचे शिक्षक पन्नालाल पावरा व देवीलाल पाठक यांनी उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. मात्र, या रुग्णालयात पुरेसे कर्मचारी नसल्याने बराच वेळ या विद्यार्थ्यांकडे कुणीच लक्ष दिले नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना उपचाराअभावी ताटकळत बसावे लागले होते.
बराच वेळ वाट पाहूनही रुग्णालयातील कर्मचारी विद्यार्थ्यांकडे फिरकायला तयार नसल्याने अखेर पन्नालाल पावरा यांनी सामाजिक कार्यकर्ते पंकज पावरा यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्याकडे या संदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्याची माहिती मिळते. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजात कोणताही बदल दिसून आलेला नाही.
दरम्यान, या दवाखान्यातील मनमानी कारभार व कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे परिसरातील रुग्णांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, तातडीने उपाययोजना न केल्यास दवाखान्याला कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन रुग्णसेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.



