नंदुरबार जिल्हा

नवापूरच्‍या चिंचपाडानजीक भीषण दुर्घटना; अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले, २१ वर्षीय तरुणाचा जागीच करुण अंत

विसरवाडी (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : मृत्‍यूचा महामार्ग बनलेल्‍या धुळे- सुरत राष्‍ट्रीय महामार्ग ५३ ने आणखी एका दुचाकीस्‍वार युवकाचा बळी घेतला. या महामार्गावरील चिंचपाडानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्‍या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्‍यू झाला. या प्रकरणी अपघातानंतर फरार झालेल्‍या संबंधित अज्ञात वाहनाच्‍या चालकाविरोधात विसरवाडी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, विशाल किसन मावची (२१, रा. बेडकीपाडा, ता नवापूर) हा युवक ३० मार्च रोजी धुळे-सुरत महामार्गाने सकाळी ११.३० वाजेच्‍या सुमारास दुचाकीवरून (क्र. जीजे २६ एजी ७१४१) विसरवाडीच्‍या दिशेने निघाला होता. याच दरम्‍यान चिंचपाडा गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका अज्ञात वाहनाने त्‍याच्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे विशाल रस्‍त्‍यावर फेकला जावून त्‍याला जबर जखमा झाल्‍या. काही क्षण तडफडून त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. अपघातानंतर दुचाकीला धडक देणारे वाहन घटनास्‍थळावरून निघून गेले.
अपघाताची माहिती मिळताच विसरवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र मोहने, पोलिस कर्मचारी लिनेश पाडवी, पिंटू पावरा, शाम पेंढारे आदींनी घटनास्‍थळी धाव घेतली. त्‍यांनी विशालचा मृतदेह शवविच्‍छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्‍णालयात पाठवला. दरम्‍यान, या प्रकरणी उल्‍हास किसन मावची यांच्‍या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली असून, विसरवाडी संबंधित वाहनचालकाचा शोध घेत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button