नंदुरबारकरांना रेल्वेकडून खास गिफ्ट; आता खाटूश्याम, अजमेरला दररोज जाण्याची सोय, विशेष रेल्वे नियमित धावणार; भाड्यातही होणार बचत

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबारसह खानदेशातून राजस्थानातील प्रसिद्ध देवस्थान खाटूश्याम आणि अजमेर या ठिकाणी दर्शनासाठी जाणार्या भाविकांना रेल्वे खात्याने विशेष भेट दिली आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा-हिस्सार-काकीनाडा या रेल्वेला वाढता प्रतिसाद पाहून ती नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या भागातून दर्शनासाठी जाणार्या भाविक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत नंदुरबारसह खानदेशातून खाटूश्याम व अजमेर दर्गाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांना बस किंवा रेल्वे गाड्या बदलत प्रवास करावा लागत होता. मात्र, काकीनाडा–हिस्सार रेल्वे गाडी सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ, खर्च आणि त्रास कमी झाला आहे. परंतु, ०७७०५ ही १८ फेब्रुवारीला सुरू झालेली काकीनाडा-हिस्सार ही विशेष रेल्वे २५ मार्चपर्यंतच धावणार होती. तर ०७७०६ ही परतीची गाडी २९ मार्चपर्यंत धावणार होती. या कालावधीत भाविक प्रवाशांची चांगली सोय झाली असली तरी ठरलेल्या कालावधीनंतर ती बंद होत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त करून ही गाडी नियमित करण्याची मागणी होत होती.
जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही हा मुद्दा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे लावून धरला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने ही गाडी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी १७२९५ / १७२९६ या नवीन क्रमांकासह नियमित धावणार आहे.
प्रवासी भाड्यात होणार बचत
दरम्यान, ही विशेष गाडी आता नियमित स्वरूपात रुपांतरीत झाल्याने तिच्या प्रवास भाड्यात २० ते २५ टक्के कपात होणार असल्याचा दावा केला जात आहे. धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष आणि पश्चिम रेल्वेच्या डीआरयूसीसीचे सदस्य महेंद्र कोठारी यांनी या निर्णयाबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व खा. वाघ यांचे आभार मानले आहेत.
वलसाड- दानापूर गाडीलाही मुदतवाढ
दुसरीकडे, ०९०२५ / ०९०२६ या क्रमांकाच्या वलसाड- दानापूर रेल्वेगाडीला २० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खानदेशातून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह प्रयागराजला जाण्यासाठी सोयीची असलेली ही गाडी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली असून, खानदेशातील प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या गाडीला नंदुरबारसह धरणगाव व भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.



