शेतकर्यांची अडवणूक करणार्यांना ‘कृषी’ने शिकवला धडा; शहाद्याच्या एका खत दुकानदाराचा परवाना रद्द, इतर सहा जणांचे परवाने निलंबित

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : ऐन शेती हंगामात खतांची अवैध साठेबाजी करतानाच जादा दराने खतांची विक्री करणार्या खत दुकानदारांना नंदुरबार जिल्हा कृषी विभागाने जोरदार दणका दिला आहे. खत विक्रीच्या नियमांचे उल्लंघन करून शेतकर्यांची अडवणूक करणार्या शहाद्यातील एका खत दुकानदाराचा परवाना कृषी विभागाने कायमस्वरूपी रद्द केला असून, शहाद्यातीलच पाच तर नवापुरातील एक अशा एकूण सहा खत दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत.
खरीप हंगाम जवळ येत असताना शेतकर्यांना दर्जेदार खते उपलब्ध व्हावीत, खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून अवैध साठेबाजी आणि जादा दराने खतांची विक्री केली जावू नये यासाठी कृषी विभागाने जिल्हाभरात खत विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याच अंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी व खत नियंत्रण पथकांनी जिल्ह्याच्या विविध विभागांतील खत विक्री दुकानांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीदरम्यान खत विक्री केंद्रांवरील विक्री नोंदवही, स्टॉक रजिस्टर, खत साठा, बिलिंग प्रणाली, तसेच शासनाच्या खत विक्री नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी केली जात आहे.
शहादा तालुक्यातील एका खत विक्री दुकानदाराकडून या नियमांचे पूर्ण उल्लंघन केले जात असल्याने कृषी विभागाच्या पथकाने या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. तर याच तालुक्यातील आणखी ५ दुकानदारांना नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. याशिवाय नवापूर तालुक्यातही अशाच स्वरूपाची कारवाई करताना एका दुकानदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. या नंतर या विषयावर सुनावणी घेऊन सदर दुकानदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.



