गुन्हे वार्ता

तळोद्यात लग्नात भल्‍या पहाटे राडा; नाचताना पाय लागल्‍याचा जाब विचारताच तिघांनी एकाला तुंबून काढले, डोक्‍यात फायटरही घातला

तळोदा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : लग्न सोहळ्‍यात नाचताना पाय लागल्‍याचा जाब विचारताच तिघांनी एकाला लाथाबुक्‍क्‍यांसह फायटरने मारहाण करून जखमी केल्‍याची घटना तळोदा तालुक्‍यातील रतनपाडा येथे भल्‍या पहाटे तीन वाजेच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी तिन्‍ही आरोपींवर तळोदा पोलिसांत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तळोदा तालुक्‍यातील रतनपाडा येथे दिलवर भिका वसावे यांच्‍या घरासमोर लग्न सोहळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या ठिकाणी मंडपही घालण्‍यात आला होता. या सोहळ्‍यात ३१ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. रात्री या ठिकाणी पहाटेपर्यंत नाचगाणे सुरू होते. निलेश दासू वसावे (२६, रा. रतनपाडा) तसेच धनसिंग रामू वळवी (रा. अंमलपाडा ता. तळोदा) व त्‍याचे दोन मित्रही या सोहळ्‍यात सहभागी झाले होते.
पहाटे ३ वाजेच्‍या सुमारास सगळे नाचगाण्‍यात गुंग असताना निलेश याला धनसिंगचा पाय लागला. यावर निलेशने धनसिंगला पायाने का मारतो, अशी विचारणा केली. याचा धनसिंग व त्‍याच्‍या मित्रांना राग आला. यातून त्‍यांच्‍यात वाद झाला. काही क्षणातच हा वाद वाढून धनसिंग व त्‍याचे दोन्‍ही मित्र यांनी निलेशला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण सुरू केली. याचवेळी धनसिंगने निलेशच्‍या डोक्‍यात फायटरने प्रहार केला. यामुळे त्‍याला जबर दुखापत झाली.
प्राथमिक उपचारानंतर निलेश वसावे याने धनसिंग व त्‍याच्‍या मित्रांच्‍या विरोधात तळोदा पोलिस ठाण्‍यात फिर्याद नोंदवली. त्‍यावरून गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्‍स्‍टेबल रामा वळवी करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button