नंदुरबार जिल्हा

नवापुरातील गंगापूरच्‍या जमीन संपादनाची एसआयटीमार्फत होणार चौकशी; महसूलमंत्र्यांची घोषणा, आ. रघुवंशींनी उपस्‍थित केला होता प्रश्‍न

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : गंगापूर (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथे जमीन संपादनात झालेला भ्रष्‍टाचार आणि बक्षीसपत्राच्‍या आधारावर नियमांचे उल्‍लंघन करून झालेल्‍या फेरफार प्रकरणाची अखेर विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्‍याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत केली आहे.
आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी या भ्रष्‍टाचारासंदर्भात पाठपुरावा करतानाच त्‍याविषयीचा प्रश्‍न विधान परिषदेत उपस्‍थित केला होता. या संदर्भातील चर्चेत आ. भाई जगताप आणि प्रवीण दरेकर यांनीही सहभाग घेतला होता.
भ्रष्‍टाचार करून आणि बक्षीसपत्रांचे नियम डावलून आदिवासींच्‍या जमिनी हडपल्‍या जात असल्‍याचा आरोप करीत आ. रघुवंशी यांनी मौजे गंगापूर येथे झालेल्‍या प्रकाराबाबत सरकार काय निर्णय घेणार आहे, असा प्रश्‍न उपस्‍थित केला होता. यावर उत्तर देताना बावनकुळे म्‍हणाले, कोणतीही जमीन कुणाला बक्षीस म्‍हणून दिली जावू शकते, याचे काही नियम आहेत. मात्र, गंगापूर येथील प्रकरणात मूळ जमीन मालक आणि ज्‍यांना बक्षीस म्‍हणून जमीन दिले त्‍या कुटुंबात कोणताही कौटुंबिक किंवा कायदेशीर संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे. असे असतानाही महसूल विभागाच्‍या अधिकार्‍यांनी हे बक्षीसपत्र कसे स्‍वीकारले आणि त्‍या आधारे फेरफार कसे केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकरणात सुरूवातीपासूनच मोठी गडबड झाली असून, ही गडबड करून देणारे रॅकेट सक्रिय असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे. त्‍यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल.
आदिवासींच्‍या जमिनींबाबत कलम ३६ (२) चा आदेश रद्द करण्‍याच्‍या दिलेल्‍या आदेशामुळे चुकीचा पायंडा पडण्‍याची शक्‍यता असून, हा आदेश रद्द करण्‍यासाठी सरकारकडे असलेल्‍या ‘पुनर्विलोकन’ अधिकाराचा वापर करण्‍यात येईल. तसेच यात काही तांत्रिक अडचणी आल्‍यास राज्‍य सरकारच्‍या वतीने तत्‍काळ उच्‍च न्‍यायालयात अपिल दाखल करण्‍यात येईल, असे सांगून बावनकुळे यांनी आदिवासींच्‍या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन त्‍यांच्‍या जमिनी अशा पद्धतीने हडपल्‍या जावू नयेत, असा  सरकारचा प्रयत्‍न आहे, असे स्‍पष्‍ट केले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button