नंदुरबारची जनता राज्यात सर्वात गरीब; दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत गाठला तळ, आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले वास्तव
नंदुरबार : (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : वाढत्या महागाईसोबतच राज्यातील जनतेची आर्थिक कमाईही उंच भरारी घेत असतानाच नंदुरबारकर मात्र वैयक्तिक आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील जनतेची कुठेही बरोबरी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत नंदुरबार जिल्हा राज्यात सर्वात तळाला असल्याचे उघड झाले आहे.
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतास राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्याआधी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. त्यातून महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे इंजिन असल्याचे सिद्ध झाले. याच अहवालातून राज्यातील सर्व शहरांच्या आर्थिक उन्नतीचा आलेख मांडण्यात आला. यानुसार आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांचे दरडोई उत्पन्न राज्यात सर्वाधिक म्हणजे ५ लाख १७ हजार ८७५ रुपये असल्याची आकडेवारी सांगण्यात आली.
खान्देशात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत धुळेकर जनता जळगावच्याही पुढे असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात धुळेकरांचे दरडोई उत्पन्न २७ हजार ८०४ रुपयांनी वाढून १ लाख १७ हजार १८८ रुपयांवर पोहोचले आहे. तर जळगावकरांचे आर्थिक उत्पन्न या काळात २६ हजार ४६२ रुपयांनी वाढून २ लाख ०९ हजार १६८ रुपये झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात नंदुरबारच्या जनेतचे दरडोई उत्पन्न अवघ्या १७ हजार ६६२ रुपयांनी वाढले असून, ते केवळ १ लाख २९ हजार ८०७ रुपयांवर पोहोचू शकले आहे.
खान्देशात दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत धुळेकर जळगाव आणि नंदुरबारच्या जनतेपेक्षा श्रीमंत असल्याचे स्पष्ट झाले असून, नंदुरबारचा क्रमांक केवळ खान्देशातच नव्हे तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या यादीत सर्वात शेवटचा असल्याचे दिसून आले आहे.
नंदुरबारच्या विकासाला मर्यादा
नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम क्षेत्रात येतो. त्यामुळे येथील विकासाला प्रचंड मर्यादा आहेत. डोंगराळ भाग असल्याने या जिल्ह्यात रस्ते, वीज आणि दळणवळणाच्या सोयी पोहोचविण्यात मोठया अडचणी आहेत. उद्योगांचे प्रमाण नगण्य असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील जनतेच्या उत्पन्न वाढीलाही मर्यादा आहेत. उत्पन्नाचे साधन नसल्याने या जिल्ह्यातील अनेकांना कमाईसाठी उस तोडणी किंवा मजुरीसाठी राज्यातील इतर भागांत किंवा गुजरातेत जावे लागते. हे उत्पन्न असंघटित व त्यातही नोंदणीची कमतरता या सार्यांमुळे जिल्ह्याच्या एकूण आर्थिक आकडेवारीवर होऊन दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत नंदुरबार जिल्हा सर्वात तळाला दिसत असल्याचे सांगण्यात येते.



