गुन्हे वार्ता

सराफा दुकानावर चोरट्यांचा डल्‍ला; शहादाच्‍या मंदाणातील घटना, दुकानाचे शटर उचकटून सारं काही लुटून नेलं

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादातील मंदाणा येथील मुख्‍य बाजारपेठेतील एक सराफा दुकान फोडून त्‍यातील ५० हजार रुपयांच्‍या ऐवजावर डल्‍ला मारल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहादा पोलिस ठाण्‍यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून, मुख्‍य बाजारातील दुकानाला चोरट्यांनी लक्ष्‍य केल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, प्रितेश नरेंद्र सोनार (३२, रा. सोनार गल्‍ली, शहादा) यांचे मंदाणा येथील मुख्‍य बाजारपेठेत सराफा दुकान आहे. शनिवारी (दि.७) रोजी सायंकाळी दुकान बंद करून ते घरी निघून गेले. यानंतर चोरट्यांनी या दुकानाला लक्ष्‍य केले. रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सोनार यांच्‍या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यानंतर आतील २३०० रुपयांची रोकड, इलेक्‍ट्रिक वजन काटा, चांदीचे शिक्‍के, एक टीव्‍ही, सीसीटीव्‍हीचे डीव्‍हीआर आणि इतर वस्‍तू असा एकूण ४९ हजार ८०० रुपयांच्‍या वस्‍तूंची चोरी करून पोबारा केला.
रविवारी सकाळी या दुकानाचे शटर उघडे दिसल्‍याने काहींनी याबाबतची माहिती प्रितेश सोनार यांच्‍यापर्यंत पोहोचवली. त्‍यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेत पाहणी केल्‍यावर चोरी झाल्‍याचे समोर आले. त्‍यांनी तातडीने शहादा पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार नोंदवली. यावरून शहादा पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍ह्याची नोंद करून त्‍याचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्‍स्‍टेबल मनोहर सावळे या गुन्‍ह्याचा तपास करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button