होळी पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला बोलेरोने उडवले; दोन जबर जखमी; अक्कलकुवा तालुक्यातील थरार

मोलगी (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सातपुडा पर्वतरांगांतील जगप्रसिद्ध काठीची होळी उत्सव पाहण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला बोलेरो गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण जबर जखमी झाल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा गावात घडली. जखमी झालेले दोघेही कंकळामाळ ता. अक्कलकुवा येथील रहिवासी असून, या प्रकरणी बोलेरो गाडीच्या अज्ञात चालकाच्या विरोधात बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा बिस्म्या वसावे आणि जितेश वाडग्या वसावे (दोघेही रा. कंकळामाळ, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हे दोन तरुण दुचाकीवरून (क्र. जीजे ०५ जीआर ५४९७) जगप्रसिद्ध होळी उत्सव पाहण्यासाठी काठी गावाकडे निघाले होते. याचवेळी समोरून भरधाव वेगात येणार्या बोलेरो जीपने (क्र. एमएच ०६ बीएम ०१८६) निंबीपाडा गावात पेट्रोल पंपाच्या पुढे सार्वजनिक रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यामुळे त्यांना शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या प्रकरणी मांगा बिस्म्या वसावे (२४, रा. कंकळामाळ, ता. अक्कलकुवा) याच्या तक्रारीवरून बोलेरो जीपचालकाच्या अज्ञात चालकाविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल पितांबर जगदाळे करीत आहेत.



