नंदुरबार जिल्हा

शहादाचे रहिवाशी उघड्या गटारांना वैतागले, माजी नगरसेवकांचा संताप, नगर परिषदेला दिली ‘मे एंड’ची डेडलाईन

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : उघड्या गटारांमुळे शहादा शहरातील रहिवाशांचे आरोग्‍य धोक्‍यात आले असून, या समस्‍येवर माजी नगरसेवकांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. विशेषत: नागसेन नगर भागातील उघड्या गटारांचे बांधकाम करून पावसाळ्‍यापूर्वी सांडपाण्‍याची समस्‍या न सोडविल्‍यास थेट आमरण उपोषण करण्‍याचा इशारा माजी नगरसेवक हिरालाल अहिरे यांनी नगर पालिका प्रशासनाला दिला आहे.
शहादा शहरातील नागसेननगरच्‍या प्रभाग क्रमांक ४ मध्‍ये सांडपाण्‍याच्‍या निचर्‍यासाठी पक्‍क्‍या गटारांची व्‍यवस्‍थाच नाही. यामुळे सगळे सांडपाणी रस्‍त्‍यावर साचत असून, संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्‍य पसरले आहे. शिवाय उघड्यावरील सांडपाण्‍यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, डेंग्‍यू, मलेरियासारख्‍या साथीच्‍या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पावसाळ्‍यात ही समस्‍या पराकोटीला पोहोचणार असून, हे टाळायचे असेल तर या भागात पावसाळ्‍याच्‍या आधीच पक्‍क्‍या गटारींचे काम पूर्ण करणे आवश्‍यक आहे, असे हिरालाल अहिरे यांनी न.प. प्रशासनाला दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.
हे काम करण्‍यासाठी अहिरे यांच्‍या सहकार्‍यांनी नगर परिषदेला मे अखेरपर्यंतचा वेळ दिला असून, या मुदतीत काम न केल्‍यास आमरण उपोषणाला बसण्‍याचा इशारा निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर हिरालाल अहिरे यांच्‍यासह किशोर अहिरे, तुकाराम अहिरे, योगेश अहिरे, विजय अहिरे, चंद्रकांत अहिरे, छोटू अहिरे, दीपक कापुरे, गणेश अहिरे आदींसह परिसरातील रहिवाशांच्‍या स्‍वाक्षर्‍या आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button