आई – बहिणीवरून शिवी दिल्यास होणार ५०० रुपयांचा दंड; ‘या’ ग्रामपंचायतीने घेतला ऐतिहासिक निर्णय
अहिल्यानगर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गावातील छोटी-मोठी भांडणे बंद झाली असली तरी किरकोळ वादांच्या वेळी शिव्या देऊन परस्परांच्या आई-बहिणीचा सर्रास उद्धार केला जातो. यातून महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचते. याचाच विचार करून अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील काळेगाव ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आई-बहिणीवरून शिव्या देणार्यास थेट ५०० रुपये दंड ठोठावण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी काळेगाव ही जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.८) काळेगावमध्ये विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांनी गावातील सार्वजनिक सामाजिक वातावरणाबाबत चर्चा करताना महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचविणार्या शिविगाळीच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर यावर कायमस्वरूपी इलाज म्हणून यापुढे गावात कुणीही आई – बहिणीवरून शिवी दिल्यास त्याला ५०० रुपये दंड ठोठावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली.
दरम्यान, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबंधितांना आई – बहिणीवरून शिवी दिल्याचा व्हीडिओ पुरावा म्हणून सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. असा व्हीडिओ साद केल्यास ग्रामपंचायत शिविगाळ करणार्याकडून दंड आकारणार आहे. एवढेच नाही तर गावातील सार्वजनिक स्वच्छतेचा विचार करता यापुढे घर, दुकान किंवा सार्वजनिक ठिकाणी कुणी कचरा टाकल्यास त्याचे फोटो मिळताच त्याच्याकडून १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी या निर्णयाची घोषणा केली.
दरम्यान, आई – बहिणीवरून शिवी दिल्यास दंड ठोठावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारी काळेगाव ही जिल्ह्यातील दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे. याआधी जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने नोव्हेंबर २०२४ मध्ये असा निर्णय घेतला होता.



