नंदुरबार जिल्हा

नवापूरच्‍या गंगापूरजवळ भीषण दुर्घटना; ट्रॅव्‍हल्‍सच्‍या बसने घेतला चिंचपाडातील १८ वर्षीय तरुणाचा बळी, दुसर्‍याची प्रकृती चिंताजनक

नवापूर/ विसरवाडी (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूर तालुक्‍याच्‍या गंगापूर गावाजवळ सोमवारी मध्‍यरात्रीच्‍या सुमारास भीषण दुर्घटना घडली. धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावरील गंगापूर गावाजवळ महालक्ष्मी हॉटेलसमोर उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात चिंचपाडा येथील १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून, या दुर्दैवी घटनेमुळे चिंचपाडा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सोमवारी (दि. ९) रात्री ११ वाजेच्‍या सुमारास चिंचपाडा गावाजवळील रेल्वेस्टेशन फाट्याजवळील महालक्ष्मी हॉटेलसमोर हा अपघात घडला. चिंचपाडा येथील रहिवासी महेश राजेंद्र निकम (१८) हा मुंबई येथे शिक्षणासाठी राहत होता. एक दिवसापूर्वीच तो गावी चिंचपाडा येथे आला होता. सोमवारी संध्‍याकाळी उशीरा महेश हा मित्र ऋषभ अतुल जैन (१८) याच्यासोबत स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएव ३९ एजी ८५२१) वरून महालक्ष्मी हॉटेल येथे चहा पिऊन परत चिंचपाडाच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या श्रीनाथ ट्रॅव्हल्सच्‍या लक्झरी बसने (क्र. एआर ०१ आर ६३६३) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की यामुळे महेश व ऋषभ हे दोघेही बसच्‍या पुढच्‍या चाकाखाली येऊन दुचाकीसह १० ते १५ फुट रस्‍त्‍यावर फरफटत गेले. यामुळे महेशला गंभीर जखमा होऊन जागीच त्‍याचा मृत्यू झाला. तर ऋषभ गंभीर जखमी झाला असून, त्‍याला तातडीने रुग्‍णालयात हलविण्‍यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्‍याला तत्‍काळ पुढील उपचारासाठी सुरत येथे हलविण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button