नंदुरबार जिल्हा

उच्‍चदाबाच्‍या विद्युत तारेला चिकटून ट्रकक्‍लिनरचा मृत्‍यू; शहादानजीकच्‍या सावळदातील पपईच्‍या शेतात घडली दूर्दैवी घटना

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शेतात ट्रकमध्‍ये पपई भरत असताना अचानक ३३ केव्ही उच्चदाब विजेच्या तारेचा धक्का लागून ट्रकच्या क्‍लिनरचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी शहादा तालुक्‍याच्‍या सावळदा शिवारातील शेतात घडली. या घटनेनंतर संबंधित ट्रकलाही आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने अग्निशमन दलाच्‍या जवानांनी धापळ करून ही आग आटोक्‍यात आणल्‍याने आणखी अनर्थ टळला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावळदा गावातील दरबार रघुनाथ गिरासे यांच्या शेतात पपईची (पपिता) तोडणी करून माल ट्रकमध्‍ये भरला जात होता. सोमवारी (दि. ९) दुपारी सुमारे ३ वाजेच्‍या सुमारास पपईने भरलेल्या वाहनावर ताडपत्री टाकण्याचे काम सुरू होते. ट्रकचा क्‍लिनर गाडीवर चढून ताडपत्री लावत असताना अचानक वरून गेलेल्या ३३ केव्ही उच्चदाब विजेच्या तारेच्‍या संपर्कात आला. विद्युत तारेचा हाताला स्पर्श झाल्‍याने त्‍याला उच्चदाब विद्युतप्रवाहाचा जबर धक्का बसला आणि कुणाला काही कळण्‍याच्‍या आतच तो ट्रकवरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनातही आग लागली. आग लागल्याने काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले. त्यानंतर सारंगखेडा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच शहादा येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास सारंगखेडा पोलिस करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button