नंदुरबार जिल्ह्यातील ‘त्या’ ११९ पोलीस अंमलदारांना झटका : आस्थापना मंडळाने विनंती बदल्या केल्या अमान्य!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : विविध कारणांचा दाखला देत मनपसंत जागी बदली मिळविण्याचा प्रयत्न करणार्या नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल ११९ पोलीस अंमलदारांना जोरदार झटका बसला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने या सर्व पोलीस अंमलदारांच्या विनंती बदल्यांचा अर्ज फेटाळले आहेत. पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी तसे आदेश जारी केले आहेत.
पोलीस दलात सध्या बदलांचा हंगाम सुरू असून, अशातच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेल्या ११९ अंमलदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ठराविक ठिकाणी बदल्यांसाठी विनंती अर्ज दाखल केले होते. यामध्ये १५ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ४७ पोलीस हवालदार, २ महिला पोलीस हवालदार, ४ पोलीस नाईक, ३९ पोलीस शिपाई, ९ महिला पोलीस शिपाई आणि ३ चालक पोलीस अंमलदार (१ हवालदार, २ नाईक) यांचा समावेश आहे.
या सर्व विनंती बदली अर्जांचा विचार करण्यासाठी गुरुवारी (दि. ४) जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. यावेळी संबंधित पोलीस अंमलदारांचे अर्ज, त्यांच्या अडीअडचणी, वैद्यकीय तसेच इतर कारणांचा विचार केल्यानंतर आस्थापना मंडळाने या सर्व ११९ पोलीस अंमलदारांचे विनंती बदली अर्ज फेटाळून लावले. तसा आदेश पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी जारी केला आहे. सर्व पोलीस ठाणे व शाखांच्या प्रभारी अधिकार्यांनी संबंधित अंमलदारांना त्यांचे विनंती बदली अर्ज फेटाळण्यात आल्याबाबत कळवून त्याचा अहवाल पाठवावा, असे या आदेशात म्हटले आहे.



