शहाद्यातील सात वर्षीय प्रनिका पाटीलची दुहेरी विक्रमी कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद; पालकमंत्र्यांकडून गौरव

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अवघ्या सातव्या वर्षी असामान्य बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याच्या जोरावर प्रनिका प्रफुल्ल पाटील हिने दुहेरी विक्रमाची नोंद करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रनिकाने केवळ ३ मिनिटे ३९ सेकंदांत १२० अॅबॅकस प्रश्न अचूकपणे सोडवून उल्लेखनीय कामगिरी केली असून, तिच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
प्रनिकाच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शिक्षणमंत्री आ. अमरीशभाई पटेल, आ. राजेश पाडवी, आ. आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी, शिवसेना जिल्हाध्यक्ष राम रघुवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, माजी सभापती हेमलता शितोळे, उपनगराध्यक्षा माधवी पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, पोलीस निरीक्षक निलेश देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रनिका ही औरंगपूर येथील प्रगतशील शेतकरी सुरेश गिरधर पाटील यांची नात असून, शहादा येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. प्रफुल्ल पाटील यांची कन्या आहे. अत्यंत कमी वयात मिळवलेल्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रनिकाची ही अभूतपूर्व कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरली असून, ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनली आहे. तिच्या या दुहेरी विक्रमी यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



