आजपासून सरकारी कामांचा खोळंबा; राज्यातील स्वतःला शासकीय- निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर, सरकार म्हणाले कारवाई करणार!
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यातील शासकीय सेवांचा आजपासून खोळंबा होणार आहे. कारण राज्यातील सरकारी व निमसरकारी खात्यातील सुमारे १७ लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याच्या संतापातून हा संप पुकारण्यात आला असून, राज्य सरकारने मात्र संप बेकायदेशीर ठरवत त्यात सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस तथा समन्वय समितीचे समन्वयक विश्वास काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपामध्ये राज्याच्या शासकीय सेवेतील सर्व कर्मचारी, जिल्हा परिषदांचे कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी होणार आहेत. तर राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारीही या संपात सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे या कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले आहे. दरम्यान या संपामुळे मंत्रालयापासून गाव पातळीपर्यंतची सर्व शासकीय कामे थांबण्याची शक्यता असून सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने पूर्ण सेवेवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या आहेत मागण्या…
* राज्य सरकारने २०२४ मध्ये जाहीर केलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनासंदर्भात नियम व कार्यपद्धती तसेच अटी व शर्ती स्पष्ट करणारी अधिसूचना तातडीने काढावी.
* सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करावे.
* रिक्त पदे अत्यंत धिम्या पद्धतीने भरली जात असून, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालकांची पदभरती पूर्णतः थांबवण्यात आली आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय असून त्याचा फेरविचार करण्यात यावा.
* सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व समावेशक आरोग्य विमा योजना लागू करावी.



