नंदुरबार जिल्हा

‘कृषी’ची धडकोबाज कारवाई : गुजरातेतून आलेला खतांचा साठा शहाद्यात जप्‍त; चौकशीत गडबडलेल्‍या दोघांवर गुन्‍हा

शहादा (सलाउद्दीन लोहार/ नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहरातील बायपास रस्त्यावरील अक्षर पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका गोदामावर गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत गुजरात राज्यातून विनापरवाना वेगवेगळ्या प्रकारचा ६१ हजार १३० रुपयांचा विक्रीसाठी आणलेला खतांच्या साठा आढळून आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण निरीक्षक विशाल कैलास वाकचौरे यांना विनापरवाना खत विक्री होत असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली होती. त्यांनी तत्काळ बायपास रस्त्यावरील भाड्याने घेतलेल्या गुदामाचे मालक धनंजय विनायक पाटील यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून गोदामाबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे खत विक्रीच्या व साठवणुकीच्या परवाना आढळून आला नाही. कृषी अधिकारी वाकचौरे यांनी तातडीने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्निल शेळके व तळोदा पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयवंत पराडके यांना याबाबत माहिती दिली. तसेच शहादा पोलीस ठाण्यातून बंदोबस्त मागवत पंचांसमक्ष लोखंडी कुलूप तोडून गोदाम उघडण्यात आले त्यात युरिया खताच्या पाच गोण्या, ९:२४:२४ खताच्या पाच तर मॅग्नेशियम सल्फेटच्या ५८ असा एकूण ६१ हजार १३० रुपये किमतीच्या खतसाठा आढळून आला.
दरम्यान, खत साठ्याबद्दल अधिक माहिती घेतली असता सदर खत चिनोदा (ता. निझर) येथील एका दुकानातून आणल्याचे समजले. खत विनापरवाना साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी धनंजय विनायक पाटील तसेच मयंक कृषी सेवा केंद्र (रा. निझर ता. निझर, गुजरात) यांच्या विरुद्ध कृषी अधिकारी विशाल वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश ,अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील कलम तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३१६ व ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button