दुचकीस्वारांचे अपघात थांबेनात : अक्कलकुवाच्या तरुणाला अज्ञात वाहनाने चिरडले, वडिलांना ॲम्ब्यूलन्समध्ये बसवून परतताना काळाचा घाला; एकाच दिवसातील ठरला तिसरा बळी!

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात दुचाकीस्वारांच्या अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून, शहादा व तळोदा तालुक्यांत प्रत्येकी एका तरुणाचा अपघातात बळी गेल्याच्या घटनांना काही तास उलटत नाही तोच अक्कलकुवा येथील एका दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाने बळी घेतल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा तरुण दवाखान्यातून घरी परत नेण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिकेत बसवून गावी परतत असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला. एकाच दिवसात अपघातात मृत्यूमुखी पडलेला हा तिसरा युवक ठरला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकसूदअली सफदरअली मक्राणी (३४, रा. इंदिरानगर, न्यू इंग्लिश हायस्कूलसमोर, अक्कलकुवा) असे या अपघातात दगावलेल्या तरुणाचे नाव आहे. नंदुरबार शहरानजीकच्या वाका चौरस्ता येथे शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मकसूदअली याचे वडिल गंभीर आजारी असल्याने नंदुरबारमधील एका रुग्णालयात भरती होते. शनिवारी त्यांची रुग्णालयातून सुटी होणार असल्याने तो वडिलांना घेऊन जाण्यासाठी आला होता. रुग्णालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मकसूदअली याने वडिलांना रुग्णवाहिकेत बसवले.
ही रुग्णवाहिका निघाल्यानंतर तो ही अक्कलकुव्याला परतण्यासाठी आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच ३९ एई ५०७३) निघाला. मात्र, काही अंतरावर असलेल्या वाका चौरस्ता येथे पोहोचताच एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात मकसूदअली रस्त्यावर फेकला जावून त्याच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या. यात डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाहोचलेल्या नंदुरबार उपनगर पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या प्रकरणी घटनास्थळावरून फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात नंदुरबारच्या उपनगर पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल फौलाद भिल करीत आहेत.
दिवसभरात तिसरा अपघात
हा शनिवारी दिवसभरात झालेला तिसरा अपघात ठरला. याआधी याच दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील चांदसैली येथे मित्तल जिनिंगसमोर ट्रकने दिलेल्या धडकेत ब्राह्मणपुरी येथील किरण शिवाजी सोनवणे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर काही तासांतच दुपारी चार वाजता तळोदा तालुक्यातील तळोदा ते आमलाड रस्त्यावर अमरधामसमोरील वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अमृत शांताराम पाडवी (२५, रा. रापापूर, ता. तळोदा) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर रात्री ८ वाजता नंदुरबारध्ये मकसूदअली मक्राणी (३४) या तरुणाचा अज्ञात वाहनाने बळी घेतला.



